Advertisement
नवी दिल्ली : देशाच्या राज्यघटनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे. संसदेचं विशेष अधिवेशन येत्या 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत बोलावण्यात आलं आहे. यात विविध विधेयकं मांडली जाणार आहेत. यात राज्यघटनेत मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती आहे. देशाच्या राज्यघटनेतील ‘इंडिया’ हा शब्द हटवला जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मोदी सरकारने तातडीने संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. त्यामुळे या अधिवेशन काळात कोणकोणती विधेयकं मांडली जाणार, याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मोदी सरकार काही मोठी विधेयकं आणणार असल्याची चर्चा आहे.
विरोधकांना शह देण्यासाठी मोदी सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. 2024 ची निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे. अशात ही निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. याच विशेष अधिवेशनाच्या काळात देशातील निवडणुकीतही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. तसंच याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी मोदी सरकार कसोसीचे प्रयत्नही करण्याची शक्यता आहे.
