Advertisement
बुलढाणा : इंडिया आघाडी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या बैठकीला देशभरातील 28 पक्षांचे नेते आले होते. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीला निमंत्रण देण्यात आले नव्हते. ठाकरे गटाचा मित्र पक्ष असूनही प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीपासून दूर ठेवल्या गेल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही आम्हाला इंडिया आघाडीत यायचं आहे. पण त्यांना घ्यायचं नसेल तर आम्ही कसं जाणार? असा सवाल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीच्या बैठकीत का बोलावलं नाही यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. तशी माहिती स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी निमंत्रण द्यायला ही काय सत्यनारायणाची पूजा आहे का?, असा सवाल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकरांना केला आहे.
