Advertisement
ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची थेट विनंती
सोलापूर : सोलापूर शहर तसेच परिसरात पोलीसांचे "सोयीस्कर'रित्या दुर्लक्ष असल्याने मटका तसेच अन्य अवैध धंदे फोफावले आहेत. यातून अनेक युवकांचे आयुष्य बर्बाद झाले आहे. घरातील कर्ता पुरूष वाया गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत, गेली कित्येक महिने अवैध धंद्यांवर ठोस कारवाई झाली नसल्याने याचे प्रमाण वाढतच आहे. पोलिसांना आम्ही हप्ते देतो, असे अवैध धंदेवाले उघडपणे सांगत असताना पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प आहे. याच कारणातून बहुजन रयत परिषदेने सोलापुरातील अकार्यक्षम पोलीस यंत्रणेला थेट जाब विचारला असून आयुक्त साहेब रिटायर्ड होताना तेवढी कारवाई तरी करून जा? अशी विनंतीही केली आहे.मायबहिणीची कपाळ पांढरी करणारी वेवस्था बंद करण्याऐवजी "मटका' या सारख्या अवैध धंद्यांना खतपाणी घालणारे "उद्योग' आपल्या कारकिर्दीतच का वाढत आहेत? याबाबत चिंतन करा. आपल्या नेमणुकीनंतर पोलीस "खातं' पोकळ का झाले? कोणाच्या मदतीने आणि कोणाचे ऐकून यापध्दतीने अवैद्य धंद्याला प्रोत्साहन देता? मायमाऊल्यांचा आणि लेकीबाळींचा आशिर्वाद घेण्यासाठी काम करा. काळापैसा मिळत असला तरी आपल्या कृत्याने समाज उद्धवस्त होत आहे, याचे भान ठेवा. तुमची निवृत्ती जवळ आली म्हणून जीवनातून लोकांना निवृत्त करु नका. तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्षच करायच असेल तर समकक्ष अधिकाऱ्यांना चार्ज देऊन मोकळे व्हा, असे थेट आव्हान बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना केले आहे.
सोलापुरात गल्ली-बोळात सर्वत्र मटका-जुगारांचे अड्डे सुरू आहेत. विशेष म्हणजे अतिशय पद्धतशीरपणे या अवैध धंद्यांचा व्यावसाय एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे चालविला जात आहे. या मटका, जुगारासह अवैध धंद्यांमुळे गोरगरीब, मजुर, हातावरचे पोट असलेले युवक, कामगारांचे संसार उद्वस्त झाले आहेत.
सोलापुरात पसरलेले मटक्याचे जाळे हे पोलिसांच्या आशिर्वादामुळेच सर्रास बिनदिक्कत सुरू असल्याचे उघड आहे. पोलिसांचे हात ओले करून दुसऱ्याच्या ताटातील घास ओढून आपल्या पोटावरून हात फिरवत ढेकर देणाऱ्या अवैध धंदेवाल्यांवर पोलीस कारवाई करीत नसतील तर असे धंदे करणाऱ्यांपेक्षा पोलीस यंत्रणेलाच गुंड, मवाली, टोळी अशी विशेषने लावावी लागतील, अशी स्थिती आहे.
महिन्याला 15 कोटींची काळी उलाढाल
सोलापुरात महिन्याला अंदाजे 15 कोटीं पेक्षा अधिक रक्कमचे काळी उलाढाल या धंद्यांतून होत आहे.
विशेष म्हणजे सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तसेच सोलापूर शहरालगत असलेल्या सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून अंदाजे मटका, जुगाराच्या चार हजार टपऱ्या आहेत. सामान्यांना या टपऱ्या दिसत असल्या तरी पोलिसांना मात्र या टपऱ्या दिसत नाहीत. ओपन, क्लोज व पानाच्या स्वरूपात उघडपणे चालणाऱ्या मटका धंद्यात दररोज 40 ते 50 लाखांची म्हणजे महिन्याला अंदाजे 15 कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते. कमीत कमी पैशातही मटका लावला जात असल्यो मजुर, कामगार अगदी कोवळ्या वयातील लहान मुलेही मटका, जुगाराच्या आहारी गेली आहेत.
पोलिसांकडून खोटी कारवाई
वरिष्ठांकडून आदेश आल्यावर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना मटका, जगार अड्ड्यावर धाडी घालाव्या लागतात, अशावेळी पोलीस निरीक्षकांचा वसुलीवाला त्या भागातील स्थानिक "मटका किंग'ला कारवाई होणार आहे. सामान उलला आणि 15 ते 20 जण ताब्यात देण्यासाठी तयार ठेवा, अशी माहिती पुरवतो. त्यानंतर खोटी कारवाई होऊन एक-दोन दिवसात पुन्हा मटका, जुगाराचा अड्डा सुरू होतो.