Advertisement
15 दिवसानंतर जरांगे पाटील यांचं उपोषण सुटणार?
सराटी : मराठा आंदोलकांनी आजही आंदोलन सुरूच ठेवलं आहे. बुलढाण्यात तर मराठा आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात यावं. मी उपोषण सोडेन. पण माझं आंदोलन सुरूच राहील, अशी अट मनोज जरांगे पाटील यांनी ठेवली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणासाठी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता हे नेते जालन्यात पोहोचणार असून जरांगे पाटील यांचं उपोषण सोडणार आहेत. त्यामुळे आज 15 दिवसानंतर जरांगे पाटील यांचं उपोषण सुटणार आहे.
दरम्यान, पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करुन चंद्रकांत पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असून त्यांची भूमिका समजून घेणार आहेत.