Advertisement
मुंबई : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांचं जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्रे द्यावे. कारण मराठवाड्यातील काही जिल्हे निजाम संस्थेत होते. त्यावेळी शेती करणाऱ्या मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिलं जात होतं. पण नंतर हे संस्थान महाराष्ट्रात विलीन झालं तेव्हापासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीय. त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने जीआर काढला आहे.
"जीआर" नेमकं काय म्हटलं आहे?
मराठा समाजातील द्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसूली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्खनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख “कुणबी” असा असेल, तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करुन त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपणासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या समितीत महसूल आणि वन विभागाचे अपर मुख्य सचिव, विधि आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त यांचा समावेश आहे.
