Advertisement
मोहोळ : बहुजन रयत
परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मोहोळ तालुक्यातील
प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी
यांच्यासमवेत विविध प्रश्नांवर चर्चा केली. विशेष म्हणजे राजकीय सोपस्कार बाजूला
ठेऊन ही चर्चा एक छोट्याशा हॉटेलात चांगलीच रंगली. त्यामुळे गाडीच्या काळ्या काचा
खाली घेऊन तसेच खादीच्या कपड्यांची इस्त्रीही मोडू न देता कायम प्रसार माध्यमांशी
(वि)संवाद साधणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांत "ताईं'च्या या चाय पे चर्चाची चांगलीच चर्चा
मोहोळ तालुक्यात रंगली.
बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून ऍड.
कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी ही चाय पे चर्चा केली असली तरी लोकसभा किंवा
विधानसभेला त्या निश्चतीच उमेदवार असणार, हे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कळत
नाही का? कदाचित असा "ताईं'चा समज झालेला असावा. परंतु, सर्व प्रसार माध्यमांच्या
प्रतिनिधींशी चर्चा करताना "ताईं'नी कोणताही राजकीय विषय काढला नाही. याउलट
सामाजिक, शैक्षणिक, महिला यासह त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी,
छायाचित्रकांराची आस्थेने चौकशी केली. या विशेष चर्चेत ताईंनी चहाच्या कपासोबत
प्रसार माध्यामांशी असलेली आपुलकीची गोडीही जपली. याबाबत सर्वांनी समाधान व्यक्त
केले.
यावेळी भाजपा प्रज्ञावंत आघाडी जिल्हा संयोजक अविनाश पांढरे, मोहोळ
तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय आठवले, पंढरपूरचे युवा नेते शैलेश धोत्रे,
तालुका भाजपचे उपाध्यक्ष विनोद बाबा देशपांडे, मोहोळ तालुका भाजपाचे संघटन सरचिटणीस
तथा पत्रकार महेश सोवनी, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अभिमान (आबा) कोकाटे,
पत्रकार विष्णू शिंदे (अर्जुनसोंड), अक्षय ज्ञानेश्वर भोसले यांच्याहस पदाधिकारी व
मान्यवर उपस्थित होते.