Advertisement
लातूर : नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक विभागातून खोटे अपंग प्रमाणपत्र
दिल्या प्रकरणी कारवाई करण्याबाबत लातूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून 10
महिन्यांपूर्वी आश्वासन देण्यात आले होते. परंतु, याबद्दल कुठलीच कारवाई करण्यात
आलेली नाही. यासंदर्भात लातूर विभागातून नेमणूक केलेल्या चौकशी समितीकडून
अहवालानुसार काहीही माहिती दिली जात नाही, याचा निषेध म्हणून आरोग्य सेवा लातूर
उपसंचालक कार्यालयासमोर बुधवारी (दि.04) कार्यालयीन वेळेत बहुजन रयत परिषदचे बेमुदत
धरणे व बोंब मारो आंदोलन प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या
नेतृत्त्वाखाली करण्यात येणार असल्याचे नांदेड जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडीले यांनी
सांगितले. गेल्या दहा महिन्यांपासून दिलेल्या निवेदनानुसार सदरील कार्यालयातील कर्मचारी यांना विचारले असता उपसंचालक साहेब मिटींग मध्ये आहेत, साहेब बाहेर गेले आहेत.., मॅडम मिटींग मध्ये आहेत...,मॅडम मुंबईला गेल्या..., तुमचे पत्राचे उत्तर पोस्टाने पाठवून दिले आहे, अशी उत्तरे दिली जात आहेत. कार्यवाही प्रकरणी टाळाटाळ केली जात आहे. बोगस खोटे अपंग प्रमाणपत्र दिलेल्या या प्रकरणाबाबत सदर कार्यालयाकडून कुठलीच ठोस कार्यवाही होत नसल्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच कामकाजात पारदर्शकता यावी या मागणीसंदर्भात लातूर आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे व बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, कार्यालयीन वेळेत बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याने याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील. आंदोलनाच्या वेळेत माझ्या जीवाचे काही वाईट झाल्यास यास आपण जबाबदार असाल असेही साहेबराव गुंडीले यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भातील निवेदनाची प्रत लातूर जिल्हाधिकारी लातूरचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे. सदरील आंदोलनात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, कार्याध्यक्ष ऍड. शोभा पिल्ले, प्रदेश सचिव ईश्वर क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक ना.म साठे, प्रदेश उपाध्यक्ष मीनाक्षी सकट, प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, प्रदेश संपर्क प्रमुख दत्तात्रेय पाटील, मराठवाडा उपाध्यक्ष राजीव कसबे, लातूर जिल्हाध्यक्ष श्रीमंत गायकवाड, नांदेड शहराध्यक्ष भारत कलवले, नांदेड शहर सचिव प्रा.सी.एल.कदम, नाशिक शहराध्यक्ष अंबादास आहिरे, तुळजापूरचे तुकाराम गायकवाड, लातूर महिला जिल्हाध्यक्ष शितल कोमलवार, भोकर तालुका अध्यक्ष साहेबराव भालेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. लातूर आरोग्य उपसंचालक यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे... 1) अपंग प्रमाणपत्र धारकांची समक्ष पूर्ण तपासणी करून दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी. 2) जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड येथील विभागातून 2017 ते 2022 पर्यंत देण्यात आलेले अपंग प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी. 3) खोटे अपंग प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवर कडक कार्यवाही करण्यात यावी. टाळाटाळ करणाऱ्यां कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत. | |||