Advertisement
व्याख्यानमालेत प्रा. विजय रास्ते यांचे प्रतिपादन
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात मानवतावादी तत्त्वज्ञान दिसून येते असे मत प्रा. विजय रास्ते यांनी व्यक्त केले.दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या विद्यमाने आयोजित व्याख्यानमाला पुष्प 398 वे गुंफताना "साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे मानवतावादी तत्त्वज्ञान व फकीरा कादंबरी"या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, समाजाच्या उन्नतीसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा व कुटुंबाचा विचार न करता सर्वतोपरी प्रयत्न करणे, दुर्बलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बंड करून, जाब विचारून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे आदी बाबी फकिरा कादंबरीत दिसून येतात. मैत्री कशी असावी, वैर व्यक्तीशी नसावे तर त्यांच्या वाईट वृत्तीशी असावे. वैर मरावे पण वैरी जगावा. थोरामोठ्यांचा आदर, स्त्रियांचा आदर, देशभक्ती व मातृ भक्ती, प्राणीमात्रावरील प्रेम इत्यांदी बद्दल चे मानवतावादी तत्त्वज्ञान फकीरा या कादंबरीत दिसून येते.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना दलित स्वयंसेवक संघाचे माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे म्हणाले की, अण्णा भाऊंनी श्रमिक कष्टकऱ्यांना व शेतकऱ्यांना महत्त्व दिले. देव देवतांना व अंधश्रद्धेला मानण्यापेक्षा मातृभूमी, राष्ट्रपुरुषांना स्वातंत्र्यवीरांना, त्यागी हुतात्म्यांना, कष्टकऱ्यांच्या हाताला आपल्या कवणातून वंदन केले.ते भांडवलशाही विरोधात आयुष्यभर उभे राहिले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे बोलताना म्हणाले की,समृद्ध साहित्यात मराठी मुलखात दोन तुकारामांनी मराठी साहित्य समृद्ध केले. संत तुकारामांची गाथा लोक गंगेने तारली, तर साहित्यसम्राट अण्णा भाऊंचे वाङमय मराठी मुलखाने लोक गंगेच्या मौखिक शब्दांनी काळजावर कोरले. साहित्यसम्राट अण्णा भाऊंची लेखणी लाखात देखणी आहे. अण्णा भाऊंनी लौकीक प्रतिभेचं देण मराठी मुलखाला बहाल केले. अण्णांच्या प्रतिभेने गायलेली छक्कड मराठी मुलखानी काळजावर कोरली. गुलाबी गालिचावर रुतून बसली. फकीरा मधील दौलती, सावळा, घमांडी, साधू, तायनू महार, बाजा वारीक, शंकर पाटील, विष्णुपंत कुलकर्णी ही सगळी मंडळी जिगरबाज माणुसकी वारणा खोऱ्याला अजूनही साद घालते. यातच मराठी मुलखाचे सौख्य सामावले आहे.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुजित रणदिवे यांनी केले तर आभार जेष्ठ साहित्यिका श्रीमती सुभा लोंढे यांनी मांनले.
सदर प्रसंगी कार्याध्यक्ष लक्ष्मण लोंढे, सेवानिवृत्त डीवाय.एस.पी. रणखांबे साहेब व एस.ए. खंकाळ, कावेरी जाधव, संपर्कप्रमुख साहेबराव खंडाळे, डॉ. नारायण डोलारे, ज्येष्ठ सामाजिक नेते यादवराव तथा अंकल सोनवणे, विजय कांबळे, प्रा.उर्मिला पवार, आबा वाघमारे, प्रताप जाधव, शिवाजी तलवारे, विशाल लोखंडे, उफळाई गावचे श्री व सौ पाटोळेआदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नकोसा बाई लोखंडे व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी खंकाळ यांनी प्रबोधन गीते व शाहिरी गीते सादर केली.
