Advertisement
| सोलापूर :
दिल्लीत मुक्कामी असलेले भाजपचे महाराष्ट्राचे राज्य प्रवक्ते माजी मंत्री
लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजप मित्र पक्षांच्या नेत्यांच्याही गाठीभेटी सुरू केल्या
असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत मी राजकीय नव्हे तर वेगळ्या सामाजिक विषयक
कामासाठी आलो आहे, असे ढोबळे यांनी स्पष्ट केलेले आहे. परंतु, ढोबळे यांनी आज
दिल्लीत घेतलेली सामाजिक न्यायमंत्री अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख
रामदास आठवले यांची भेट ही आगामी काळातील सोलापुरातील निवडणुकांना कलाटणी देणारी
ठरू शकते. कारण, आरपीआयची मत ज्या पक्षाच्या पारड्यात पडणार त्या पक्षाचा उमेदवार
आघाडी घेऊन विजयी होतो, हे आजपर्यंतच्या निकालांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेहमीच आरपीआयची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आली आहे.
याच कारणातून आज दिल्ली येथे सामाजिक न्यायमंत्री आठवले यांची भेट माजी मंत्री
प्रा. ढोबळे यांनी घेतली की काय? अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी आठवले यांची भेट माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी घेतली. यावेळी "उपराकार' लक्ष्मण माने हे ही उपस्थित होते. यावेळी झालेल्या औपचारिक चर्चेत आठवले यांनी विविध विषयांसह आगामी 2024 मधील निवडणुकांबाबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात "इंडिया' एकवटली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीही सातत्याने होत आहेत. आता, या बैठकीमध्ये इंडिया आघाडीने त्यांच्या पंतप्रधान पदाचा उमेदवारही ठरवावा. आता, 26 पक्ष एकत्र आले आहेत यामध्ये आणखी भर पडेल, विरोधकांना जेवढा कांगावा करायचा आहे तेवढा करावा. परंतु, जनता आपल्या सोबत आहे. लक्ष्मणराव 2024 मध्ये मोदींच्या नेतृत्वातच पुन्हा आपले सरकार येईल, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले सांगितले. आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष महायुती सोबत राहील. ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहेत त्या ठिकाणी काही जागा आम्हाला द्याव्यात, अशी मागणी आम्ही करणार आहोत. मंत्रिमंडळात आम्हाला एक मंत्रीपद द्यावं आणि महामंडळ द्यावं अशीही मागणी केल्याचेही रामदास आठवले यांनी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याशी बोलताना सांगितले. आता, असे मुद्दे चर्चेत असतील तर...? आम्हाला काय, समजलेली माहिती "आठवली' म्हणून सांगितली. | |||
