Advertisement
मुंबई : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला ठाकरे गटाशी जागा वाटपाची चर्चा करता येत नाहीये. त्यामुळे वंचितमध्ये अस्वस्थता आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला जागा वाटप लवकरात लवकर करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीकाही केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आमची ठासणी झाली. बोलणी झाली. पण लग्नाची तारीख काढायला दोन भटजी आडवे येत आहेत. एकाचं नाव आहे काँग्रेस. दुसऱ्याचं नाव आहे एनसीपी. दोन्हीही पक्ष आपसात तडजोड करत नाहीत. शिवसेनेसोबतही बोलणी करत नाहीत. त्यांनी भिजत घोंगडं ठेवलं आहे. त्यांनी घोंगडं भिजत का ठेवलंय हेही सांगत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा होत नाही. त्यामुळे कोण कुणासाठी काम करतोय याबाबत शंका वाटते. मी आज शंका घेत नाही. पण वेळ येईल तेव्हा शंका घेऊ, ही हवं तर धमकी समजा. तुमची युती होणार असेल तर युती होणार सांगा आणि सीट वाटप करून घ्या. सीट वाटप केलं नाही तर आम्ही उद्धव ठाकरेंवर दबाव टाकू. यांच्यासोबत जायचं की नाही जायचं हे ठरवा, असं उद्धव ठाकरे यांना सांगू. प्रेशर टाकून युती करू, असं त्यानी स्पष्ट केलं.