Advertisement
पुण्यातील स्नेहसंमेलनास उपस्थिती; संघाची इमारत आता नव्या स्वरूपात
पुणे : सामाजिक कार्याला एखादे कार्यालय देखील कशी निश्चितपणे प्रेरणा देते, याचा अनुभव माझ्यासह अनेकांनी जुन्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विविध संस्था-संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांनी पुणे शहरातील ‘मोतीबाग’ कार्यालयात घेतला आहे. राजकारणी नव्हे तर समाजकारणी होते, त्यांनी मोतीबाग अनुभवली आहे, असे प्रतिपादन भाजपचे राज्य प्रवक्ते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
पुणे शहरातील संघाचे कार्यालय असलेली ‘मोतीबाग’ नव्या स्वरूपात उभी राहिली आहे, यानिमित्त येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवारी (ता. 25) करण्यात आले होते. याचे आमंत्रण भाजपचे राज्य प्रवक्ते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर तसेच भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी दिले होते.
पुणे शहरातील राजकीय वर्तुळातही मोठा संपर्क असलेले ज्येष्ठ नेते ढोबळे यांनी आवर्जून या कार्यक्रमास हजेरी लावत संघाचे पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. भाजप प्रवक्ते ढोबळे म्हणाले की, एखादे कार्यालय देखील सामाजिक कार्याला निश्चितपणे प्रेरणा देऊ शकते, हा अनुभव राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विविध संस्था-संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांनी ‘मोतीबाग’ कार्यालयात घेतला आहे. पुण्यात संघाचे काम 1933 मध्ये सुरू झाले. टिळक स्मारक मंदिर जेथे आहे, तेथे संघाची पहिली शाखा सुरू झाली होती. पुण्यात संघाच्या शाखांची संख्या वाढू लागल्याने मोठ्या कार्यालयाची आवश्यकता होती सरदार बिवलकर यांनी त्यांची जागा कमी किमतीत देण्याची तयारी दर्शविल्यानंतर 1952 मध्ये जी जागा संघाने घेतली तीच ही शनिवार पेठेतील ‘मोतीबाग. 1961च्या पानशेत पुरात या ‘मोतीबागे’च्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले होते, पूरग्रस्तांना मदतीसाठी जाणारे स्वयंसेवक आधी मोतीबागेमध्ये यायचे. येथून पुढे संघाचे काम वाढत गेल्याने 1962 मध्ये ‘मोतीबागे’त नव्याने काही बांधकाम केले गेले. यामध्ये मोठे तळघर, त्यावर एक सभागृह म्हणजे मोरोपंत पिंगळे सभागृह, त्यावर एक सभागृह आणि एक खोली एवढे बांधकाम पहिल्या टप्प्यात करण्यात आले. 1983 मध्ये ‘मोतीबागे’चे दुसर्या टप्प्यातील बांधकाम झाले. तर 2003मध्ये नवी इमारत उभारण्यात आली.
मोतीबागेतील 70 वर्षांच्या घडामोडींचे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अशोकराव कुकडे हे साक्षीदार आहेत. बाळासाहेब साठे जेव्हा शहर प्रचारक म्हणून आले, तेव्हा ही ‘मोतीबाग’ हे कार्याचे केंद्र झाले. वैयक्तिक संपर्क, काही कार्यक्रमांची रचना-योजना यात बाळासाहेबांचा सहभाग होता. श्रीगुरुजींच्या अनेक बैठका मोतीबागे मध्ये झालेल्या आहेत. संघप्रचारक दादाराव परमार्थ, यादवराव जोशी, एकनाथजी रानडे यांचीही वर्दळ येथे असायची याशिवाय येथे अटलबिहारी वाजपेयी शाखेवर स्वयंसेवक म्हणून आले होते. पं. प्रेमनाथ डोगराही एकदा प्रल्हाद शाखेवर आले होते, याशिवाय डॉ. मोहन भागवत या सरसंघचालकांचे वास्तव्य मोतीबागेत राहिले आहे. ‘मोतीबाग’ हे संघाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होण्यात अनेक पिढ्यांनी आपले योगदान दिले आहे. कार्यालय हे व्यवस्थेचे स्थान नसून संघटनासूत्र राबविणारे किंवा रुजविणारे स्थान आहे, असेच म्हणावे लागेल.
