Advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटपावरुन महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे. याचं कारण ठाकरे गटाने आपण 23 जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. खासदार संजय राऊत यांनी आपण 23 जागांवर ठाम असल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना टोला लगावत दिल्लीत चर्चा सुरु असून, येथील गल्लीतील लोक बोलल्यास कोण ऐकणार? असं म्हटलं आहे. तसंच वंचितसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांशी आमची चर्चा सुरु आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, वेणुगोपाल, खर्गे यांच्याशी आमच्या पक्षाची, उद्धव ठाकरेंची चांगल्या प्रकारे संवाद सुरु आहे. आम्ही किती जागा लढणार ही चर्चा दिल्लीत होईल. येथील गल्लीतील लोक बोलल्यास कोण ऐकणार?आम्ही 23 जागा लढत आले असून, ती कायम ठेवू असंच म्हणालो आहोत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. काँग्रेसने महाराष्ट्रात एकही जागा जिंकली नसून, त्यांना शून्यापासून सुरुवात करायची आहे असंही ते म्हणाले.
