Advertisement
अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमध्ये भाजपसोबत जा मी राजीनामा देतो, असं शरद पवारच म्हणाले होते, असा गोप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वांबरोबर चर्चा करुन घेतला. चर्चेत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटीलही होते, असा धक्कादायक गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनी आम्हाला गाफिल का ठेवलं असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
कर्जतच्या चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण बाहेरचं आंदोलनही ठरवून केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. यशवंत राव चव्हाण सेंटरबाहेर काही महिला, पुरुष हवे आहेत, त्यांनी आंदोलन करायचं असं सांगण्यात आलं. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, राजीनामा परत घ्या, परत घ्या अशी घोषणाबाजी करण्यात आली, हे काय चाललंय तेच कळत नव्हतं. मला एक सांगतायत, दुसरीकडे वेगळचं चाललंय, नंतर राजीनामा मागे घेण्यात आला. शरद पवारांकडून सांगण्यात आलं, माझ्यानंतर सु्प्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्याला सर्वांनी तयारी दाखवली, या सर्व गोष्टी ठरलेल्या होत्या असा दावाही अजित पवारांनी केला.