Advertisement
सोलापूर : सोलापूरातील पूर्व भागातील काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता , आमदार प्रणिती शिंदे यांचा कट्टर समर्थक तथा माजी नगरसेवक मेघनाथ येमुल बुधवारी काँग्रेस पक्षाला रामराम करीत भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत, त्यांच्यासमवेत त्यांचे शेकडो कार्यकर्ते बुधवारी भाजपात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात दुपारी साडेतीन वाजता पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे खासदार होण्यासाठी मतांची जुळवाजुळव करणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
सोलापूरात दाजी पेठ येथील सिध्दनागनाथ मंदिरातील अप्पा गणपतीची महाआरती केल्यानंतर यमुल आणि कार्यकर्ते यांचा भाजपाच्या सिव्हिल चौकातील पक्षकार्यालयात पक्षप्रवेश होणार आहे. भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे व भाजपाचे ज्येष्ठ नेते मेघनाथ येमुल यांच्या निवासस्थानी जाऊन त्याचं भाजपा पक्षप्रवेशाबद्दल सत्कार करण्यात आला होता. पण अधिकृतपणे त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला नव्हता.
आमदार विजयकुमार देशमुख हे त्यावेळी मुंबईत होते. दोन दिवसांपुर्वी आमदार विजयकुमार देशमुख यांनी माजी नगरसेवक मेघनाथ येमुल यांच्याशी भाजप पक्षप्रवेशाबाबत चर्चा करुन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेसाहेब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करावा अशी विनंती केली. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौरा करत आहेत. बुधवारी भाजपाच्या विविध पदाधिकारी व संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत. यात दौऱ्यात माजी नगरसेवक मेघनाथ येमुल व अन्य भाजपात पक्षप्रवेश करणारे नेत्यांना बावनकुळेच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश देणार आहेत. पुर्व भागात काँग्रेस पक्षाचा किल्ला लढवणारा आमदार प्रणिती शिंदे यांचा खंदा समर्थकच भाजपाच्या कळपात जात असल्याने या भागात आता भाजपा अधिक भक्कम झाला आहे.
