Advertisement
तपासणी अहवाल येऊ द्या, उपोषण तात्पुरते स्थगित ठेवण्याची अधिकार्यांची विनंती
तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही भाविक दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता राज्य सरकारकडून या ठिकाणी सुसज्ज बसस्थानक उभारले जात आहे. याकरिता पूर्वीचे जुने बसस्थानक पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु, सदर बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने दि.11/12/2023 रोजी बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी तुळजापूर येथे पाहणी करू या कामाविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार संबंधीत अधिकारी तसेच ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
यानुसार या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी साखळी उपोषण सुरू करण्याचा इशाराही दिला होता. परंतु, दि.13/12/2023 रोजी विभागीय अभियंता यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार सदर कामाच्या दर्जा तपासणीच्या चाचण्यांचे अहवाल शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव गांच्याकडे प्रलंबीत असल्यामुळे सदर कामाचा दर्जा तपासणीचा अहवाल येईपर्यंत उपोषण तात्पुरते स्थगीत ठेवण्याची विनंती केल्याने तसेच, सदर कामाचा दर्जा तपासणी अहवाल दाखवून जिल्हाअध्यक्ष बहुजन रयत परिषद धाराशिव थांना विश्वासात घेऊनच सदरचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन अभियंत्यांनी दिल्याने बहुजन रयत परिषदेने उपोषण स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, याबाबत बहुजन रयत परिषदेच्या अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पाया भरणीचे खोदकाम करताना काढण्यात आलेली माती बाजूला टाकण्यात आली होती, तीच माती बेसमेंट केल्यानंतर मधले रिकामे रान भरून घेण्यासाठी वापरण्यात आली आहे. त्या ठिकाणी मुरमाचा वापर करणे गरजेचे होते.सदरचे काम लेंटल लेवलपर्यंत केले आहे. या बांधकामावर आवश्यकतेनुसार पाणी मारण्यात आलेले नाही. बसस्थानकाचे काम डस्टमध्ये करण्यात आले आहे हे बांधकाम करताना अंदाजपत्रकात ठरवून दिलेया ज्या अटी-नियम आहेत, त्यानुसार करायचे आहे. परंतु, त्याप्रमाणे करण्यात आलेले नाही. प्रवाशांच्या निवार्यासाठी चांगल्या दर्जाचे काम करून घेण्यात यावे जेणेकरून ते काम दीर्घकाळ टिकेल अन्यथा जनतेचे कोट्यावधी रुपये वाया जातील. या कामासंदर्भातील दर्जा तपासणीचा अहवाल योग्य आला नाही तर बहुजन रयत परिषदेच्यावतीने पुन्हा आंदोलन तसेच उपोषण करण्यात येईल, असा इशाराही अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी दिला आहे.
