Advertisement
दिल्ली : संसद भवनावरील हल्ल्याच्या 22 व्या स्मृतीदिनी लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून काही तरुणांनी उड्या मारल्या अन् सभागृहात पिवळ्या रंगाचा वायू सोडला. सभागृहाच्या बाकावर उड्या मारत सुरक्षा कर्मचाऱ्यांची दैना उडवली. या प्रकरणात चार नव्हे तर पाच आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नीलम, मनोरंजन, सागर आणि अमोल शिंदे यांचा समावेश आहे. तर पाचवा आरोपी ललित झा हा अद्याप फरार आहे. संसदेत हल्ल्याचा मास्टरमाईंड हा पळून गेलेला ललित झा असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
अटक केलेल्या चार आरोपींचे फोनही ललितकडे असल्याचं बाकीच्या आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे. त्यानंतर आता ललितचा शोध घेणं सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचं शेवटचं ठिकाण राजस्थानमध्ये सापडलंय. त्यानंतर त्याचं कोलकाता कनेक्शन देखील समोर आलंय. ललित सध्या पश्चिम बंगालमधील एका एनजीओशी जोडला गेलाय. तो या एनजीओशीमध्ये सरचिटणीस पदावर आहे. ललित झा याने एनजीओचे संस्थापक नीलाक्ष आइच यांना संसदेतील सुरक्षेतील त्रुटींचा व्हिडिओही व्हॉट्सअँपवर शेअर केला होता. नीलाक्ष यांच्या मदतीने पोलिसांनी आता शोधाशोध सुरू केली आहे. चार आरोपींनी ललित झा यांच्या सांगण्यावरून स्मोक कलर हल्ल्यासाठी 13 डिसेंबरची तारीख निश्चित केली होती.
