Advertisement
भीमा कोरेगांव विजयस्तंभ अभिवादन अनुयायांना जेवणासह सुविधा
पुणे : भीमा कोरेगाव येथे शौर्यदिन (दि. 1 जानेवारी) साजरा करण्याकरिता बार्टी संस्थेच्या महासंचालकांनी निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष विभागाने दिले होते. सरकारच्या निर्देशानुसार हा निधी देण्यात आल्याचे बार्टी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
पेरणे फाटा येथे 1818 साली भिमा कोरेगाव भिमा लढ्यामध्ये अद्वितीय शौर्य गाजविणार्या शुरवीर महार योद्ध्यांच्या गौरवार्थ उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगांव विजयस्तंभ अभिवादनासाठी शौर्यदिन साजरा करण्यासाठी देशभरातून भीम अनुयायी अभिवादनासाठी दाखल झाले होते. सदर शौर्यदिनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने पुणे जिल्हधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समितीने अभिवादन सोहळ्यासाठी येणार्या अनुयायांना देण्यात येणार्या सर्व तर्हेच्या पायाभूत सुविधांसाठी सुमारे 14 कोटी रुपयांची निधीची मागणी विविध विभागांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडे केली त्यानुसार सदर निधी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दि. 1 जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्यदिनी विजयस्तंभ मानवंदना देण्यासाठी देशभरातून आलेल्या अनुयायांना सालाबादप्रमाणे साधारणत 50 हजार व्यक्तींना शासनाच्या निर्देशानुसार भोजन दिले जाते. त्याकरिता भोजन खर्च हा बार्टीतील यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस, फेलोशिप, पीएचडी विद्यार्थी शिष्यवृत्ती, विद्यावेतन निधीच्या योजनेतील नसुन तो दि. 20 डिसेंबर 2022च्या शासन निर्णयानुसार शौर्यदिन साजरा करण्याकरिता महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी सद्यस्थितीत तातडीची बाब लक्षात घेऊन उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष विभागाने दिलेले आहेत.
समाजातील काही पक्ष, संघटनांनी बार्टी मार्फत प्रकाशित करण्यात आलेली भोजन निविदा तात्काळ रद्द करावी अशी मागणी केली होती. तथापि भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन करण्यासाठी देशातील व इतर राज्यातील तसेच मराठवाडा, विदर्भ व संपूर्ण राज्यातून लाखोच्या संख्येने अनुयायी येतात, तसेच 25 डिसेंबर मनुस्मृती दहन महाड, 25 डिसेंबर देहूरोड बुद्ध मूर्ती वर्धापन दिनानिमित्त अभिवादन करून सर्व अनुयायी मोठ्या संख्येने 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना देण्यासाठी येतात. या अनुयायांना भोजनाची व्यवस्था असावी, असा आग्रह काही पक्ष व संघटनांनी बार्टी संस्थेकडे धरला, यातूनच सदर उपक्रम बार्टीकडून राबविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
बार्टी दिनविशेष कार्यक्रमांतर्गत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व इतर महामानवांच्या जयंती व पुण्यतिथी तसेच महत्त्वपूर्ण दिनी अभिवादन करून महामानवांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला जातो. विविध पक्ष संघटनांच्या मागणीनुसार 50 हजार अनुयायांना शौर्यदिनी शासनाच्या निर्देशानुसार भोजन पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली आहे.
