Advertisement
मुंबई : मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनाही नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने मनोज जरांगे यांना आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. तसंच राज्य सरकार आणि पोलिसांकडे नियोजनाची माहिती मागितली आहे.
आंदोलनादरम्यान पोलिस आणि राज्य शासन कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार याची माहिती देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे.
मनोज जरांगे यांना ते आंदोलन कशाप्रकारे करणार आहेत? सोबत कोण असणार आहे? कशी यंत्रणा आहे? सोबत किती लोक असतील? ही सगळी माहिती कोर्टात द्यावी लागणार आहे. आझाद मैदान पोलिसांनाही नोटीस बजावण्यात आली असून, जर लाखोंच्या संख्येने लोक आले तर काय व्यवस्था करण्यात आली आहे याची विचारणा केली आहे. राज्य सरकारलाही कोर्टाने नोटीस पाठवली असून ही तुमची जबाबदारी असल्याचं सांगितलं आहे. तुमचं नेमकं काय नियोजन आहे याची माहिती त्यांनी मागवली आहे.
