Advertisement
मुंबई : आमदार अपात्रता निकालाविरोधात एकीकडे उद्धव ठाकरेंनी आरोपांची राळ उठवलीय तर दुसरीकडे पक्ष बळकटीकरणासाठी स्ट्रॅटेजी आखलीय. उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाचे दिग्गज नेते लोकांमध्ये जाऊन संवाद साधणार आहेत. नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट गावोगावी फिरणार आहे. या मोहीमेची सुरुवात होणार आहे. विदर्भातून रामटेकपासून ठाकरे गट प्रचाराची सुरुवात करेल. रामटेकच्या प्रचाराचं नेतृत्व एकप्रकारे रश्मी ठाकरेकरतील. रामटेकमध्ये त्या स्त्री संवाद यात्रा घेणार आहेत. महिला कार्यकर्त्या तसंच मतदारांशी त्या संवाद साधतील.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमानेंनी शिंदे गटात जाणं पसंत केलं. संजय राठोड, भावना गवळींनीही ठाकरे गटाची साथ सोडलीय. विदर्भात ठाकरे गटाची फारशी ताकद नसतानाही नुकसान झालंय, त्यामुळेच सर्वात आधी विदर्भाकडे ठाकरेंनी कूच केली आहे. विदर्भात ठाकरे गटाची झालेली पडझड पाहता महिला मतदारांना साद घालण्याचं धोरण आखण्यात आलंय. त्यातही ठाकरे कुटुंबातील एक सदस्य प्रत्यक्ष मैदानात उतरतोय. त्यातून शिवसैनिकांचा आत्मविश्वास दुणावेल अशी स्ट्रॅटेजी आखण्यात आलीय. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात रश्मी ठाकरेंनी नवरात्रीत देवीदर्शन केलं होतं. रश्मी ठाकरेंचं ठाण्यात येणं ठाकरे गटासाठी बूस्ट ठरलं होतं. त्यामुळेच रश्मी ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याकडे लक्ष लागल आहे.
