Advertisement
मुंबई : महाविकास आघाडीची बैठक झाली. यामध्ये लोकसभा निवडणुकीचे जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगितले जात असले तरी जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक जागा, त्यानंतर काँग्रेसला आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काही जागा आदलाबदल होऊ शकतात, असेही सांगितले जात असताना याबैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित नव्हते, त्यांच्याशीही चर्चा सुरु आहे. दि. 30 तारखेला होणार्या पुढील बैठकीत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असल्याने त्यांनाही लोकसभेच्या जागा देण्यात येणार आहेत. गेल्यावेळी प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभेतून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात लढले होते. यावेळी जर ते महाविकास आघाडीत सहभागी होत असतील तर ते वंचीत बहुजन आघाडीसाठी ते सोलापूर लोकसभेची जागा मागू शकतील, असे झाले तर काँग्रेसला सोलापूर लोकसभेची जागा सोडावी लागेल. यातून अर्थातच लोकसभेची तयारी करणार्या सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळत प्रकाश आंबेडकर यांचा प्रचार करावा लागेल. परंतु, या जर-तरच्या चर्चा असल्याने सध्या तरी महाविकास आघाडीच्या आगामी बैठकीत वंचीतचे प्रकाश आंबेडकर बैठकीत सहभागी होणार का? आणि झालेच तर ते लोकसभेसाठी कोणत्या जागा मागणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी मजबूत आणि एकसंघ असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज झालेल्या बैठकीनंतर दिली आहे. तसेच, या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे आणि या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाशिवाय सीपीआय, सीपीएमचे नेतेही उपस्थित असल्याची माहिती संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीत सर्व काही सुखरुप असल्याचे संागत संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेसाठी जागा द्याव्या लागतील याशिवाय त्यांनी मागणी केलेल्या लोकसभा मतदार संघाचा विचार महाविकास आघाडीतील नेत्यांना करावाच लागणार आहे. त्यामुळे एकाअर्थी प्रकाश आंबेडकर यांची लोकसभेसाठीची भूमिका महाविकास आघाडीला नसली तरी सोलापुरातील काँग्रेसच्या नेत्यांना मात्र अडचणीत आणणारी ठरू शकते.
