#

Advertisement

Wednesday, January 24, 2024, January 24, 2024 WIB
Last Updated 2024-01-24T12:08:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजप जाहीर करणार सोलापूर लोकसभेचा उमेदवार ?

Advertisement

सोलापूर : लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष जोरदार तयारी करीत असल्याचे स्पष्ट होत असताना उमेदवार जाहीर करण्यासाठी भाजप उशीर का करीत आहे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सोलापूर लोकसभेत भाजपची थेट लढत काँग्रेस पक्षाशी आहे. काँग्रेसने सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदे उमेदवार असतील असे जवळपास जाहीरच केले आहे. समोर उमेदवार तयार असताना भाजपकडून मात्र उमेदवार जाहीर करण्यास बोट चेपीचे धोरण का आवलंबले जात आहे? भाजपकडे सोलापूरसाठी सक्षम उमेदवार नाही का? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.
सोलापुरात गरजू कामगारांसाठी 30 हजार घरांपैकी 15 हजार घरांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आले होते, त्यांच्या या कार्यक्रमाला अद्भुत अशी गर्दी झाल्यानंतर काँग्रेसचेच काय तर प्रत्येक विरोधी राजकीय पक्षाचे धाबे दणाणले. त्यानंतर मोदी यांच्या सभेनंतर अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. अक्कलकोट येथे राज्य शासनाकडून मल्लिकार्जुन मंदिराच्या जिर्णोद्वार कामासाठी दोन कोटींचा निधी तसेच नवीन बस स्थानकाच्या विकासासाठी 29 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. या विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर भाजपने सोलापूर लोकसभेसाठी पक्की तयारी केली असल्याचे स्पष्टच झाले. शिवाय, आगामी लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची असून त्यासाठी निवडणूक जिंकण्याच्या सूत्रानुसारच उमेदवार दिले जाणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच सोलापुरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत सांगितले आहे. सोलापुरातही अतिशय चांगला उमेदवार दिसेल, असा उल्लेखकही बावनकुळे यांनी केला होता. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही सोलापुरात एक-दोन वेळा दौरा झाला आहे त्यावेळी त्यांनीही सोलापुरात सक्षम आणि निवडून येणारा उमेदवारच दिला जाईल, असे भाजपच्या पदाधिकारी, कार्यक़र्त्यांना स्पष्टच सांगितले आहे. परंतु, भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण हे मात्र जाहीर केले जात नसल्याचे जर-तरची चर्चा अधिक रंगत आहे. विशेष म्हणजे नेमका कोण उमेदवार? याची पुसटशी कल्पनाही भाजपकडून लागू दिली जात नसल्याचे भाजप खूप मोठ्या तयारीने सोलापुरात उतरणार हे ही स्पष्ट होत आहे.  

उमेदवार निवडीबाबत लवकरच चर्चा
भाजपचे केंद्रीय संसदीय मंडळाच्या नेतृत्वाकडून महायुतीबाबत चर्चा होऊन राज्यातील कोणती जागा कोणाला सोडायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचाही निर्णय होणार आहे. लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची असल्यामुळे उमेदवार निवडून येण्याची जी काही सूत्रे आहेत, ती सूत्रे ज्यांच्याकडे असतील, त्या आधारे 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी उमेदवार ठरविण्यात येणार आहेत.