Advertisement
- प्रश्न पत्रिका सिल अगोदरच फोडल्याचे आढळले
- ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे न्यायालयाचे दार ठोठावणार
पुणे: सारथी, बार्टी, महाज्योती सीईटी परीक्षेचा पुन्हा पेपर फुटल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभाराचा नमुना आज (बुधवार) समाेर आला. या प्रकरणी संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी या प्रकाराचा निषेध नाेंदवत परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे.
आज (बुधवार) पुणे वडगाव येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. यामुळे विद्यार्थी गाेंधळून गेले.
याबराेबरच प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत या प्रकाराचा निषेध नोंदवला. त्याशिवाय परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
दरम्यान, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी घाेषणाबाजी केली. सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या बाहेर आले. सध्या, परीक्षा केंद्रावर पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.
