#

Advertisement

Tuesday, February 27, 2024, February 27, 2024 WIB
Last Updated 2024-02-27T14:35:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरातून लोकसभेसाठी गेल्या 73 वर्षांत महिला उमेदवाराला संधी का नाही? यावेळी तरी इतिहास बदला : अ‍ॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांचे आवाहन

Advertisement

सोलापूर: सोलापूर लोकसभेसाठी उपरा उमेदवार शोधण्यापेक्षा मी सक्षम उमेदवार असल्याचा दावा करणार्‍या माजी खासदार शरद बनसोडे यांच्या विधानावर बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशध्यक्षा अ‍ॅड. कोमल ढोबळे-साळुखे यांनी आता तरी ही जागा महिलांसाठी सोडा, असे आवाहन केले आहे. 1951 ते 2019 या कालावधीत सोलापुरातून लोकसभेसाठी एकदाही महिला उमेदवाराला संधी दिली गेलेली नाही. एकदा सोलापूर महिला खासदाराकडे देऊन बघा, मागील 73 वर्षांतील विकासाचा अनुशेष भरून निघेल, असे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी सांगितले.

सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करताना आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवितील, असे जाहीर केले आहे. या मतदार संघात भाजप आणि काँग्रेस अशी सरळ लढत होत आहे. भाजपने आपला उमेदवार अद्यापही जाहीर केलेला नाही. त्यामुळेच इच्छुकांची यादी सतत वाढत चालली आहे त्यात आता खासदारकी ‘उपभोगलेले’ अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी पाच वर्षानंतर पत्रकारांसमोर येत आपलीही लोकसभा लढण्याची इच्छा असल्याचे त्यांनी नकळतपणे जाहीर केले.  

महापालिकेतील पत्रकारांसोबत बाकड्यावर गप्पा मारताना भारतीय जनता पक्षाला उपरा उमेदवार कशाला पाहिजे, मी सक्षम उमेदवार आहे की. मला 2019च्या निवडणुकीवेळी मला थांबविण्यात आले. पक्षाचा आदेश म्हणून मी बाजूला झालो. परंतु, यंदा बाहेरून उमेदवार आणणार असतील तर मी आहे की. शरद बनसोडे कोण आहेत हे सर्वांना माहीत असल्याचे सांगत त्यांनी लोकसभेची उमेदवारीच मागितली आहे. यावर सोलापुरातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली असताना यामध्ये प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून सक्षम दावेदार महिला उमेदवार म्हणून अ‍ॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांचे नाव आघाडीवर आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, सोलापुरच्या इतिहासात आजपर्यंत लोकसभा निवडणुकीला पुरूष उमेदवारच दिले गेले. एकदाही महिलेला संधी दिली गेलेली नाही. अनेक पक्षाचे उमेदवार निवडून आलेे परंतु, सोलापुरचा कुठल्याच बाबतीत विकास झाला नाही. आज, भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्तव आहे. यापाठबळावर सोलापुरचा सर्वांगिण विकास करणे शक्य आहे परंतु, याकरिता सक्षम खासदार हवा. इतकी वर्षे पुरूष उमेदवाराला संधी दिली गेली आहे. यावेळी भाजपने महिला उमेदवार संधी दिली तर गेल्या 50 वर्षांत झाला नाही असा सोलापूरचा विकास करता येईल. परंतु, यामध्ये इच्छुक उमेदवारांत पुरूष उमेदवारांचीच यादी वाढत आहे. त्यात आजी-माजींचीही भर पडत आहे. त्यातच शरद बनसोडे यांनी स्थानिक उमेदवार असावा आणि मी सक्षम असल्याचा दावा केल्यानंतर परत त्यांनाच का संधी? अशी प्रश्‍नार्थक चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. आतापर्यंत अनेकांना संधी पक्षाने दिली आहे. आता, तरी ही जागा महिलांना सोडावी, असे आवाहन करीत महिला लोकसभेत सध्या प्रभावीपणे काम करीत आहेत. जिल्ह्यातील बेरोजगारी, पिण्याचे पाणी, विमानसेवा, उद्योगधंदे, रेल्वे यासह सर्वांगिण विकासावर प्रभावीपणे प्रश्‍न मांडू शकतील, त्यामुळे ही जागा महिलांना सोडण्यासाठी आग्रह धरण्याची गरज असल्याचेही अ‍ॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी स्पष्ट केले. 


सोलापुरात होऊन गेलेले खासदार

1951 : शंकर मोरे : अनसुचित जाती महासंघ 

1957 : टी.एच.सोनावणे : संयुक्त महाराष्ट्र समिती 

1962 : मडेप्पा काडाडी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 

1967 : सुरजतन दमाणी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 

1971 : सुरजतन दमाणी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

1977 : सुरजतन दमाणी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

1980 : गंगाधर कुचन : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

1984 : गंगाधर कुचन : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

1989 : धर्मण्णा सादुल : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

1991 : धर्मण्णा सादुल : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

1996 : लिंगराज वल्याळ : भारतीय जनता पार्टी

1998 : सुशीलकुमार शिंदे : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

1999 : सुशीलकुमार शिंदे : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

2003 : प्रतापसिंह मोहिते पाटील : भारतीय जनता पार्टी

2004 : सुभाष देशमुख : भारतीय जनता पार्टी

2009 : सुशीलकुमार शिंदे : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

2014 : शरद बनसोडे : भारतीय जनता पार्टी

2019 : जयसिद्धेश्वर स्वामी : भारतीय जनता पार्टी