Advertisement
सोलापूर : देशातील खवय्ये 'फास्ट फूड'कडून 'मिलेट फूड'कडे वळत आहेत. भविष्यात मिलेटच्या माध्यमातून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थाची मागणी वाढणार आहे. जिल्ह्यात मिलेट उत्पादक अतिशय चांगले खाद्यपदार्थ तयार करीत आहेत. मात्र, मिलेट पदार्थांचा प्रचार, प्रसार व्हावा यसाठी उत्पादकांनी पॅकेजिंग, मार्केटिंग, ब्रडिंग यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
बालाजी सरोवरमध्ये सावली फाउंडेशन आणि ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी मिलेट फेस्टिव्हल आणि हुरडा पार्टी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार बोलत होते. यावेळी भाजपचे राज्य प्रवक्ते माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, उद्योजक राम रेड्डी, राज मणियार, कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे, संयोजक काशीनाथ भतगुणकी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की, मिलेटचा प्रचार, प्रसार व्हावा तसेच उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता यावी यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करेल. या फेस्टिव्हलमध्ये महिला कृषी उत्पादक कंपन्यांनी तृणधान्यापासून बनविलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टाल उभारण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या, यातील विजेत्या महिलांना कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
