Advertisement
स्कूल बस मालकांचा राज्य सरकारला इशारा
मुंबई : राज्यातल्या चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजता भरणार आहेत. सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक (GR) राज्य सरकारने काढलं आहे. आता पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा सकाळी नऊच्या नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांनी विरोध केला आहे. शिक्षण विभागाने चर्चा न करता मार्ग काढल्याने निर्णयाची अंमलबजावणी करताना अडचण होत असल्याचं स्कूल बस मालकांचा म्हणणं आहे.
निर्णयावर फेरविचार न केल्यास आणि स्कूल बस मालकांना सक्ती केल्यास स्कूलबस चे भाडे 25 ते 40 टक्क्यांनी वाढवणार असा इशाराही स्कूल बस मालकांनी दिला आहे. पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंत शाळा सकाळी नऊ नंतर भरवण्याच्या शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला स्कूल बस मालक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. शाळा व्यवस्थापन आणि स्कूल बस मालकांशी कुठल्याही प्रकारे चर्चा न करता हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्याचा स्कूल बस मालकांचे म्हणणं आहे. सकाळी नऊला जर शाळा भरत असेल तर मुंबईत गर्दीच्या वेळी म्हणजेच पीक आवर मध्ये स्कूल बसला फेऱ्या माराव्या लागणार आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि रस्त्याची स्थिती याची जाणीव राज्य सरकारला आहे. शिवाय प्राथमिक शाळा सकाळी नऊ नंतर भरवल्यास दोन शिफ्टचे व्यवस्थापन स्कूलबस मालकांना शक्य होणार नाहीत.
