Advertisement
आयकर विभागाची ही कारवाई
दिल्ली : काँग्रेसने आपली सर्व बँक खाती गोठवण्यात आली असल्याचं जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा आगामी काही दिवसांमध्ये जाहीर होणार असतानाच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि युथ काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहेत. पक्षाचे प्रवक्ते अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. ही कारवाई लोकशाही प्रक्रियेसाठी मोठा धक्का असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच खाती गोठवण्यात आल्याने पगार देणं, बिलं भरणं शक्य होत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, या आरोपानंतर काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळाला. इनकम टॅक्स ट्रिब्युनलने पक्षाची मागणी ऐकून तत्काळ खात्यांवरील बंदी हटवली. यासंदर्भात सुनावणी होणार असून सविस्तर आदेश दिले जातील अशी माहिती पक्षाचे नेते विवेक तन्खा यांनी दिली आहे.
