#

Advertisement

Saturday, February 3, 2024, February 03, 2024 WIB
Last Updated 2024-02-03T13:24:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात भाजप राजकीय अपमानाचा वचपा काढणार; शिंदेंना आव्हान देण्यास तयार

Advertisement
लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे लोकसभेच्या प्रबळ दावेदार

सोलापूर : भारतीय जनता पक्षातून सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या उमेदवार असतील, त्या भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा मध्यंतरी तापली होती. त्याच दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूरचे माजी आमदार सुशीलकुमार शिंदे यांनीही भाजपकडून आम्हाला ऑफर असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती. शिवाय, सोलापूर लोकसभेसाठी भाजपला सक्षम पर्याय हवा असल्याने प्रणिती शिंदे या भाजपत निश्चित प्रवेश करतील, असे वातावरण तयार झाले होते. यापार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये धुसफुस सुरू झाली होती, शिंदे कुटुंब भाजपमध्ये येत असेल तर आम्ही पक्ष बदलतो, अशी भूमिकाही अनेकांनी खासगीत घेतली होती. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत पक्षाची भूमिका मांडावी लागली होती. परंतु, भाजप आपला उमेदवार जाहीर करीत नसल्याने प्रणिती शिंदे याच भाजपच्या उमेदवार असतील, ऐनवेळी त्यांचे नाव जाहीर केले जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, काँग्रेसी म्हणून जन्मले, काँग्रेसी म्हणून मरेन... मी काँग्रेसमध्येच असणार आहे... काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात आहे.., अशा प्रकारची स्पष्ट भूमिका काँग्रेसच्या एका कार्यक्रमात आणि समाज माध्यमाच्या एका साइटवर जाहीर केल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशाच्या नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. एकुणच शिंदेंनी भाजपला फाट्यावर मारल्याची स्थिती सोलापुरात निर्माण करण्यात हे पिता-पुत्री यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच आता लोकसभेला सोलापूरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे याच उमेदवार असतील हे फायनल झाल्याने त्यांच्या विरोधात सक्षम महिला उमेदवार चेहरा शोधण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे या सर्व पातळीवर प्रबळ दावेदार मानल्या जात असल्याचे भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

सोलापुर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरूद्ध भाजप असा थेट सामना असणार आहे. त्यामुळे स्वत:चे काँग्रेसी पारडे जड करण्यासाठी भाजपला कमी लेखण्यासाठी शिंदें पिता-पुत्रींकडून राजकीय खेळी मांडली गेली होती. भाजपच आम्हाला ऑफर देत असल्याचे सांगून भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सातत्याने सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही ही बाब खरी वाटू लागली होती. परंतु, भाजपला गाफील ठेवण्यासाठीच भाजप प्रवेशाचा वावड्या उठविल्या जात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याच कारातून भाजपने आपला सोलापुरचा लोकसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे जाहीर केल्याने भाजपने आता सक्षम उमेदवाराची शोध मोहीम हाती घेतली आहे. शिंदे पिता-पुत्रीने भाजपशी थेट राजकारण केल्याने कोणत्याही परिस्थिती निवडून येणारा उमेदवार भाजपला हवा आहे, त्यातही काँग्रेसचा उमेदवार महिला असल्याने भाजपनेही सोलापुरात महिला उमेदवार देण्याचीच तयारी केली आहे. यात सर्वाधिक सक्षम, प्रबळ दावेदार म्हणून माजी मंत्री लक्ष्णराव ढोबळे यांच्या कन्या अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे नाव आघाडीवर आहे. प्रणिती शिंदे यांच्या तोडीस तोड उच्चशिक्षण, आरक्षीत उमेदवार, तळागळातील समाजमान्य चेहरा, भक्कम राजकीय पाठींबा, सामाजाचा पाठींबा, थेट मतदारांशी असलेला संपर्क अशा सर्वच पातळीवर खर्‍या उतरणार्‍या म्हणून अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे नाव घेतले जात आहे. सोलापुरातील विविध समाज, संघटनांचाही पाठींबा असल्याने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना टक्कर देण्यासाठी अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे याचा भाजपच्या लोकसभेच्या प्रभावी उमेदवार ठरू शकतील, अशी जोरदार चर्चा सोलापुरात आहे.