Advertisement
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी उभी राहिलेली इंडिया आघाडी फुटत चालली आहे. या आघाडीत आज पुन्हा फूट पडली. आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये इंडिया आघाडी एकत्रित लढणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत घरोबा केल्यानंतरची इंडिया आघाडीतील ही दुसरी मोठी फूट आहे.
आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब लोकसभेच्या सर्वच्या सर्व 13 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतानाच या उमेदवारांच्या नावाची घोषणा येत्या 15 दिवसात करणार असल्याचंही आपने जाहीर केलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. तर, इंडिया आघाडीतील या फुटीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोणतंही तगडं आव्हान राहणार नसल्याचंही अधोरेखित झालं आहे.
आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खन्ना येथे एका रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी भगवंत मान यांनी आम आदमी पार्टी पंजाबमधील लोकसभेच्या 13 आणि चंदीगडमधील एक अशा एकूण 14 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. तसेच या उमेदवारांच्या नावांची घोषणाही लवकर करण्यात येणार असल्याचं भगवंत मान यांनी सांगितलं. पंजाबच्या खन्ना जिल्ह्यात ही रॅली झाली. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते होम डिलिव्हरी स्कीमची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान यांनी चंदीगडसह पंजाबमधून आप सर्वच्या सर्व 14 जागा जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केला.
