Advertisement
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणामुळे आता राजकारण चांगलंच तापल आहे. शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करा, अशी मागणी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी फडणवीसांकडे केली. शिंदे गटाच्या मंत्र्यांनीच आता फडणवीसांवर दबाव टाकला. तेव्हा देवेंद्र फडणवीस गणपत गायकवाडांवर काय कारवाई करणार? कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. मात्र, गणपत गायकवाडांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.. कारण त्यांची आमदारकीच रद्द होण्याची शक्यता आहे.
गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराची माहिती विधीमंडळाला प्राप्त झालीय. कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर विधीमंडळ पुढची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या कारवाईमुळे गणपत गायकवाडांची आमदारकीच रद्द होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलीय. एकाच प्रकरणात दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास आमदारकी, खासदारकी तातडीने रद्द केली जाते. आमदारकी रद्द करण्याचे आदेश विधीमंडळ आणि संसदेतून काढले जातात. अनेक प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयाच्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान दिलं जाते. अशा परिस्थितीत आमदारकी किंवा खासदारकी रद्द केली जात नाही. विधीमंडळ किंवा संसदेने आदेश काढल्यास संबंधित सदस्यांना आपलं पद कायम ठेवता येतं.
