Advertisement
बारामती : लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला मत द्या; विधानसभेला अजितला मत द्या, असे तुम्हाला सांगितले जाईल. पण, तुम्ही ते डोक्यातही आणू नका. ते मला अजिबात चालणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही माझ्याच विचाराच्या उमेदवाराला निवडून द्यावे. उद्या खासदारकीचा उमेदवार मी दिला आणि त्यात जर मिठाचा खडा लागला तर आमदारकी लढवायची की नाही, असा वेगळा विचार मी करेन. त्यावेळी मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
बारामतीत व्यापारी महासंघाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पवार म्हणाले की, मी आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला गेलो होतो. तेव्हा प्रफुल्ल पटेल अमित शहा यांना म्हणाले होते की, छत्तीसगढ जिंकणे अवघड आहे. तेव्हा अमित शहा म्हणाले होते, ‘लिखकर देता हूं....तीनही राज्ये येणार...इतका आत्मविश्वास त्यांना आहे. मी सरकारमध्ये असल्यामुळे बारामतीत निधी येत आहे, विकासकामे होत आहेत. यापुढे आपण व्यावहारीक वागले पाहिजे.
बारामतीतून तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला तर विकास कामांसाठी मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगू शकतो. या लोकांनी आपल्या विचाराचा खासदार निवडून दिला आहे, त्यामुळे कोणाच्या पाठीशी उभे राहायचे, याचा निर्णय बारामतीच्या जनतेने घ्यायचा आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
