Advertisement
दिल्लीत पंतप्रधान मोदींसह मध्यरात्री खलबतं
दिल्ली : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. 'अबकी बार 400 के पार' अशी घोषणा दिली आहे. भाजपाने यासाठी उमेदवारांची छाननी सुरु केली असून, 100 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर ही नावं निश्चित करण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक समितीसह नरेंद्र मोदींची ही बैठक पार पडली. पुढील काही दिवसांत ही पहिली यादी जाहीर केली जाणार आहे.
भाजपाच्या या पहिल्या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश असू शकतो. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाराणसी, अमित शाह यांची गुजरातच्या गांधीनगर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची लखनऊतून उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते. याशिवाय 2019 लोकसभा निवडणुकीत थोड्या फरकाने पराभूत झालेल्या मतदारसंघातील उमेदवारही जाहीर होऊ शकतात.
नरेंद्र मोदींनी 2014 आणि 2019 मध्ये वाराणसीत मोठा विजय मिळवला होता. पहिली निवडणूक त्यांनी 3.7 लाख मतांनी जिंकली आणि दुसरी निवडणूक जवळपास 4.8 लाख मतांनी जिंकली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅटट्रीक होऊ नये यासाठी इंडिया आघाडी प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.
