Advertisement
- आर्टी स्थापनेच्या पार्श्वभूमीवर ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी घेतली भेट
- सोलापूर लोकसभेविषयीही काही मुद्यांवर चर्चा
मुंबई : बार्टीच्या धर्तीवर आता मातंग समाजासाठी आर्टीची स्थापना करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. या घोषणेचे स्वागत करत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सरकारचे आभार मानले आहेत. मुंबइ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सोलापूर लोकसभेविषयीही काही मुद्यांवर चर्चा केली. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बारामतीचे दादा आणि सोलापुरात ताई या नावाने सुपरिचीत असलेल्या ऍड. कोमलताई यांची विविध मुद्यांवरील चर्चा लक्षवेधी ठरली.
याबाबत ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, मातंग समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेषतः शैक्षणिक विकासासाठी बार्टीच्या धरतीवर आर्टीची स्थापना होणे गरजेचे होते, ही मागणी मागील अनेक वर्षांपासून मातंग समाज करीत होता. ती मागणी शासनाने मान्य केली असून येणाऱ्या काळामध्ये आर्टीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून केली आहे. ही घोषणा मातंग समाजाच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे. मातंग समाजातील विशेषतः शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते निश्चितपणे या घोषणेने सुखवणार असल्याचे ऍड. कोमलताई यांनी म्हटले आहे.
सोलापूर लोकसभेविषयीच्या चर्चेत या मतदार संघात १९५० पासून पुरूष उमेदवारालाच उमेदवारी दिली गेल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. महिला उमेदवारास एकदा तरी सोलापूर लोकसभेसाठी संधी द्यावी, अशी विनंतीही पवार यांना यावेळी केली असल्याचे ऍड. कोमलताई यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष खासदारकीला महिला उमेदवारास संधी देत असेल तर महायुतीमधील पक्षांनी एकविचाराने सोलापुरात महिला उमेदवार द्यावा, असे आपले स्पष्ट मत असल्याचेही अड. कोमलताई यांनी आवर्जून नमूद केले. या मुद्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा करू, असे आश्वपासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहे.
