Advertisement
लोकसभेसाठी ‘भाजप’कडून प्राधान्याने विचार
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे याच आता खासदार असा दावा केला जात असल्याने भारतीय जनता पक्ष नेमकी कोणाला उमेदवारी देणार, याकडे लक्ष लागलेले असताना अनेक इच्छुक तयार झाले आहेत. त्यात भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे हे सर्वच बाजुंनी प्रबळ दावेदार ठरत असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे. पहिल्या आणि दुसर्या यादीतही त्यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात असताना तिसरी आणि अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वीच अनेकांच्या पोटात ढवळू लागले आहे. याच कारणातून ढोबळे यांच्या नावाला काही बोलघेवड्यांनी विनाकारण विरोध सुरू केला आहे. पण, सोलापूर लोकसभा म्हणजे पोरासोरांची निवडणूक राहिली नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. यामुळेच नेहमीच संयमाची भूमिका ठेवणारे प्रा. ढोबळे यांनी याही वेळी शांत राहणेचे पसंत केले आहे. तर, सोलापूसाठी आपणास किंवा आपल्या कन्या अॅड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांना पक्ष संधी देईल, असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदार संघात 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सिद्धेश्वर स्वामी निवडून आल्यानंतर हा मतदार संघ गेल्या काही वर्षात ‘भाजप’मय झाला. आता, एप्रिल-मे 2024च्या लोकसभेसाठी भाजपला टक्कर देणारा उमेदवार काँग्रेसकडे आणि इतर पक्षाकडे नाही. शिवाय, वर्षानुवर्षे शरद पवार यांच्या वरदहस्त असल्याने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने खासदारकी उपभोगणारे सुशिलकुमार शिंदे यांनीही यावेळी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्याने भाजप या निवडणुकीत पुन्हा वरचढ ठरणार आहे, याच करणातून भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढविणार्यांची संख्या गेल्या महिनाभरातच वाढली आहे.
परंतु, 2019 मध्ये या मतदार संघात भाजपचे डॉ. सिद्धेश्वर स्वामी विजयी झाले असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी 70-75 हजार मतांची विजयी आघाडी 2024 मध्ये मोठी ठरणार नसल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते जाणून आहेत. यामुळे सोलापुरात भाजपला यावेळी सर्वार्थाने भक्कम उमेदवार हवा आहे. गेल्या काही दिवसांत भाजपच्या विशेष समितीने दिलेल्या अहवालानुसार सोलापूर मतदारसंघात लोकसभेसाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे ‘हुकमाचा एक्का’ ठरू शकतात. त्यातही प्रणिती शिंदे यांच्या विरोधात महिला उमेदवार देण्याचा निर्णय झालाच तर पर्याय म्हणून ढोबळे यांच्या कन्या अॅड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांचेच नाव सध्या आघाडीवर आहे.
दरम्यान, राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे शिष्य म्हणून असलेली ओळख, सलग पाच वेळा आमदारकी आणि त्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात लोकनेते म्हणून निर्माण केलेली स्वत:ची ओळख, शाहू शिक्षण संस्था, सूत गिरणी, दामाजी साखर कारखाना आणि बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांच्यामागे ठाम उभे असणारे कट्टर कार्यकर्ते यासह दलित म्हणून मातंग समाजाची मोठी ताकद यावर लक्ष्मणराव ढोेबळे यांना भाजपची उमेदवारी मिळू शकते. ढोबळे हे सोलापूर लोकसभा निवडणूक सहज जिंकून देऊ शकतात, हे भाजपचे राज्यातीलच वरिष्ठ नेते जाणतात.
