Advertisement
स्थानिक प्रबळ दावेदारांची नाराजी भाजपला ऐन निवडणुकीत भोवणार
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे याचे नाव निश्चित झाले आहे. याउलट भारतीय जनता पक्ष मात्र याला का त्याला, अशाच मनस्थिती अडकला आहे. विशेष म्हणजे स्थानिक प्रबळ दावेदार असतानाही भाजप आपल्या धोरणानुसार नवा चेहरा देण्याच्या प्रयत्नात अनोळखी उमेदवार सोलापूरकरांवर लादत आहे. याच कारणातून अनेकांच्या नाराजीचा फटका भाजपला ऐनवेळी निवडणुकीत बसू शकतो. बाहेरचा उमेदवार सोलापूरचा खासदार होण्यापेक्षा प्रणिती शिंदे काय वाईट आहेत? अशी मानसिकता तयार होत आहे. भाजप बाहेरच्या अनोळखी उमेदवारास संधी देऊन स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेत आहे. भाजपच्या अशा कारभारामुळे काँग्रेसचा विजय निश्चीत असल्याचेही ठामपणे सांगितले जात आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघात 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सिद्धेश्वर स्वामी निवडून आल्यानंतर हा मतदार संघ ‘भाजप’मय झाला असल्याचे छातीठोकपणे सांगितले जात होते. परंतु, त्यापूर्वीचे माजी खासदार शरद बनसोडे असो की त्यानंतरचे स्वामी यांनी सोलापूरच्या विकासासाठी कुठलेही ठोस काम केली नसल्याची भावना सोलापुकरांच्या मनात आहे. भाजपला गेली दहा वर्षे सोलापूरकरांनी संधी दिली आहे. परंतु, त्या तुलनेत स्थानिक खासदारांनी कामे केलेली नाहीत. आजही, औद्योगिक वसाहत, विमानतळ असे मोठे प्रकल्प लालफितीतच अडकून ओहत. सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कुठल्याही खासदाराने दिल्ली दरबारी मांडलेला नाही. यासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आडम मास्तर यांनी मजुरांकरिता घरे उपलब्ध करून दिली असली तरी हा प्रकल्प केंद्र सरकारच्या योजनेतून पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्याचे श्रेय खासदारांना देता येणार नाही. ही पार्श्वभूमी पाहिली तर भाजपचा उमेदवार सोलापुरातून निवडून येईल, असे कोणताच पदाधिकारी ठामपणे सांगू शकत नाही. यामुळेच 2019 मध्ये या मतदार संघात भाजपचे डॉ. सिद्धेश्वर स्वामी विजयी झाले असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी 70-75 हजार मतांची विजयी आघाडी 2024 मध्ये मोठी ठरणार नाही. यामुळे सोलापुरात उमेदवार देताना भाजपला अनेक नावे चाचपटून पहावी लागत आहेत. त्यातच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक जण कान फुंकत आहेत, यामुळे भाजपकडून सध्या तरी नको ती नावे लोकसभेचा उमेदवार म्हणून पुढे येत आहे. अशातच उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव समोर आले आहे, तेच आता अंतिम असल्याचेही सांगितले जात आहे. परंतु, स्थानिक प्रबळ उमेदवार सोडून भाजप अनोळखी उमेदवार सोलापुरकरांवर का लादत आहे. अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भाजप पक्षांतर्गत तसेच व्यक्ती म्हणून कांबळे हे मोठे आहेत मात्र, सोलापुरात त्यांचा लोकपरिचय नाही, अनेक जणांनी त्यांना पाहिलेले नाही. केवळ कमळ चिन्हांवर भाजपचा उमेदवार निवडून येईल, अशी सध्याची भाजपची सोलापुरातील स्थिती नाही. सोलापुरातील जागरूक जनता केवळ मोदी आणि कमळ पाहून मतदान करणार नाही. आजपर्यंत भाजपचे दोन खासदार निवडून दिले त्यांनी काय केले, याचा लेखाजोखा आता मतदार मांडू लागले आहेत. त्यामुळे बाहेरचा उमेदवार येथे येऊन खासदार होणार असेल तर त्यापेक्षा प्रणिती शिंदे याच खासदार बर्या, अशी मानसिकता जवळपास 70 ते 80 टक्के जनतेची झाली आहे. त्यामुळे भाजप बाहेरचा आयात केेलेला उमेदवार देवून सोलापूरची सिट यावेळी घालविणार, अशी स्थिती आताच निर्माण झाली आहे.
