Advertisement
शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजीचा सूर
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजीचा सूर पाहायला मिळाला. सोलापूर उमदेवार प्रणिती शिंदे या आम्हाला विश्वासात घेत नाहीत, असं नाराजी बोलून दाखवली. त्यांच्या उमेदवारीवर शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत ‘मातोश्री’वर अर्थात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही कळवल्याची माहिती आहे.
मातोश्रीवरून जोपर्यंत आदेश येत नाही, तोपर्यंत ठाकरे गट लोकसभा उमेदवाराचे काम करणार नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत जोपर्यंत जागांची बोलणी ठरत नाही तोपर्यंत ठाकरे गट प्रचारात सहभागी होणार नाही. येत्या दोन ते तीन दिवसात मातोश्रीवर याबाबत आपले मत मांडण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतला आहे.
दरम्यान, प्रणिती शिंदे या सध्या सोलापूर मतदारसंघाचा दौरा करत आहेत. अशात भाजप खासदारांवर त्यांनी टीका केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गीत बोलताना त्यांनी सोलापूरचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींवर टीका केली.
