Advertisement
बीड : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे बीडमधून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. दरम्यान, आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती, असं पंकजा मुंडे म्हणाल्या तसंच धनंजय मुंडेंचा पक्ष सोबत असल्याने ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रीतमला जास्त वेळ घरी थांबावं लागणार नाही, असं सूचक विधानही त्यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झाली ही सन्मानजक बाब आहे. प्रीतम मुंडे खासदार होत्या, तेव्हा मी राज्याचं राजकारण करत होते. त्या खासदार असताना मी 5 वर्षं घरी बसले. आम्हाला तोदेखील अनुभव आहे. आता मी थेट केंद्रात जाणार असल्याने संमिश्र भावना असून, धाकधूक वाटत आहे. पण या नव्या अनुभवासाठी मी तयार आहे, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. आम्ही दोघींपैकी एकीचं नाव येईल याची खात्री होती. त्यामुळे मनात भीती असण्याचं कारण नव्हतं असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली असून, तोच सन्मान म्हणून मी स्विकार करते असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.
