Advertisement
बारामती : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सूनेत्रा पवार यांना तिकिट मिळणं जवळपास निश्चित आहे. पण शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना आव्हान दिल्याने बारामतीची पेच कायम आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपण माघार घेणार नसून, वेळ पडल्यास अपक्ष लढू असा निर्धार विजय शिवतारे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचाही प्रयत्न केला. पण शिवतारे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. विजय शिवतारे यांनी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंची भेट घेतलीय. या भेटीच्यावेळी शिवतारेंनी थोपटेंना भूतकाळात पवारांमुळे झालेल्या पराभवाची आठवण करुन दिली. मागच्या आठवड्यात पवारांनीही थोपटेंची भेट घेतली होती. त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत रंगणार आहे.
विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या मुलाविरोधात प्रचार केला होता. याचा राग अजित पवारांनी मनात ठेवला. तू पुन्हा कसा निवडून येतो हे पाहतो. मी कोणाला पाडायचं ठरवलं तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही, असं आव्हानच अजित पवार यांनी शिवतारेंना दिलं होतं. आम्हीच पुण्याचे मालक अशी यांची मानसिकता आहे. ती मोडली पाहिजे. फसवेगिरी करणं आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे अशा अविर्भावात असतात. यांना कसलाच पश्चाताप नाही, असा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे.
