Advertisement
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले शरद पवारांनी सांगतिले तर...
सातारा : सातारा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे. मात्र या ठिकाणी श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत निवडणूक लढवण्यास समर्थता दर्शवल्याने मागील वेळेप्रमाणे यंदा उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नाहीत. त्यामुळेच शरद पवार कोणता उमेदवार देणार यासंदर्भात चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटल्यानंतर सूचक विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे इथे सक्षम उमेदवार नसल्याचं चित्र दिसत असून यावर काँग्रेस काय करणार? अशा अर्थाचा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी, "काँग्रेस यासंदर्भात काही करणार नाही. हा स्थानिक प्रश्न आहे. तो शरद पवारांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. जो काही सर्वमान्य निर्णय होईल तो मान्य असेल," असं म्हटलं. शरद पवारांनी तुम्हाला उमेदवारी दिली तर निवडणूक लढणार का? या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक उत्तर दिलं. "मला जर त्यांनी (शरद पवारांनी) आदेश दिला तर माझी (सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक) लढायची तयारी आहे. पण हा निर्णय शरद पवारांचा आहे," असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
