#

Advertisement

Friday, April 5, 2024, April 05, 2024 WIB
Last Updated 2024-04-05T11:48:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अ‍ॅड. कोमलताई ढोबळे यांची नाराजी उघड?

Advertisement

मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीची जोरदार चर्चा 
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरातील 48 मतदार संघातील उमेदवार जवळपास निश्‍चित झाले आहेत. अनेक मतदार संघात अपेक्षित असलेल्या नावांपेक्षा इतर उमेदवारांना संधी दिली गेल्याने सर्वच राजकीय पक्षांत नाराजीनाट्य सुरू आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाला अशा नाराज उमेदवारांची मोठी डोकदुखी असताना सोलापूर मतदार संघातून महिला उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या तथा भाजप प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी थेट भाजप विरोधी भूमिका घेतली असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यांनी शरद पवार यांच्या फोटोचे ठेवलेल्या स्टेटसचा विषय ताजा असतानाच त्या प्रदेशाध्यक्षा असलेल्या बहुजन रयत परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत त्यांनी सध्याच्या राजकीय फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. आगामी काळात त्या कोणता मोठा राजकीय निर्णय घेणार का? अशीही चर्चा यानिमित्त सुरू आहे. 

अ‍ॅड. कोमलताई या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्या नसल्या तरी त्यांचे पिताश्री भाजपचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे अ‍ॅड. कोमलताई यांनी बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेणे आणि आजच्या राजकीय स्थितीवर टीका करणे म्हणजे भाजपला घरचा आहेर असल्याचे मानले जात आहे. ऐन लोकसभा निवडणुकीवेळी लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अ‍ॅड. कोमलताई यांनी अशी भूमिका घेणे भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.

सोलापुरात काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढत होणार हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. त्यातच काँग्रेसकडून महिला उमेदवाराचे नाव घोषित झाल्यानंतर महिला उमेदवार म्हणून अ‍ॅड. कोमलताई साळुंंखे-ढोबळे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार, अशी राळ प्रसार माध्यमांतून उडाली होती. स्वत: अ‍ॅड. कोमलताई यांनी कधीही भाजपकडे उमेदवारी मागितली नाही. मात्र त्यांचे पिताश्री लक्ष्मणराव ढोबळे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याने  अ‍ॅड. कोमलताई यांचेच नाव सातत्याने पुढे येत राहीले. सोलापुरात भाजपला प्रबळ उमेदवर मिळत नसल्याने अ‍ॅड. कोमलताई यांनाच उमेदवारी मिळणार, असा दावा अनेक राजकीय मातब्बरही सांगत होते. याशिवाय अन्य 20 जणांच्या नावांचीही चर्चा जोर धरत होती. परंतु, ऐन वेळी भाजपने सोलापुरात पुरूष उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अ‍ॅड. कोमलताई यांच्यासह अन्य उमेदवारांची नावेही मागे पडली. परंतु, सोलापुरात बाहेरचा उमेदवार लादला गेल्याने मतदारांसह या इच्छुक उमेदवारांनीही नाराजी व्यक्त केली. अगदी उमेदवार बदला, अशी मागणीही सोलापुरातून होत होती. त्यातच महिला उमेदवार म्हणून अ‍ॅड. कोमलताई यांना वंचीत बहुजन आघाडी तसेच एमआयएम या पक्षांकडून आमंत्रित करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर स्वत: अ‍ॅड. कोमलताई यांनी आजपर्यंत कोणतीही थेट प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. परंतु, पुणे येथे झालेल्या त्यांच्या बहुजन रयत परिषदेच्या बैठकीत त्यांनी सध्याची राजकीय स्थितीवर टीका केली आहे. त्यात थेट भाजपला चिमटे काढण्यात आले आहेत. यातून अ‍ॅड. कोमलताई यांची नाराजी पहिल्यांदाच उघडपणे समोर आली असल्याचे बोलले जात आहे.

 संघटनेची नेहमी प्रमाणे वार्षिक बैठक : अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे
पुणे येथे झालेल्या बैठकीबाबत प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. कोमलताई यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता. बहुजन रयत परिषदेची वार्षिक आढावा बैठक असते. त्यानुसार यामध्ये काही पदाधिकार्‍यांशी केवळ चर्चा झाली. यामध्ये मी कोणत्याही पक्षावर टीका केलेली नाही. समाजासाठी मी काम करीत आहे आणि ते कायम करीत राहणार. त्यामुळे याचा कोणीही राजकीय सोयीचा अर्थ काढू नये.