Advertisement
मुंबई : काँग्रेसमधील एकामागेएक दिग्गज नेते सत्ताधारी पक्षांमध्ये सहभागी झाले आहेत. यानंतर आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या कुणाचाच फोन घेत नसल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले, पण वर्षा गायकवाड यांनी भेट दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड गैरहजर राहिल्यामुळे मुंबई काँग्रेसची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. वर्षा गायकवाड फोनही घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. वर्षा गायकवाड या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड कोअर समिटी सदस्यांचेही फोन घेत नसल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईतील दक्षिण मध्यची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला आली नसल्यामुळे मुंबई काँग्रेसमधील पदाधिकारी नाराज आहेत. त्यांची संपूर्ण एकत्रित बैठक ही वर्षा गायकवाड यांच्यासोबत नियोजित होती. पण वर्षा गायकवाड या बैठकीला आल्या नसल्यामुळे ही बैठक मुंबई काँग्रेसकडून रद्द करण्यात आली आहे.
पक्षश्रेष्ठींकडे वर्षा गायकवाड यांच्याकडून पटोलेंची तक्रार
वर्षा गायकवाड काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज आहेत. वर्षा गायकवाड यांनी नाना पटोले यांच्याबाबतची नाराजी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नाना पटोले जागावाटपाच्या वेळी पक्षाची बाजू आग्रहीपणे मांडू शकले नाहीत, अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
