#

Advertisement

Thursday, April 25, 2024, April 25, 2024 WIB
Last Updated 2024-04-25T11:23:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जनतेशी बांधिलकी जपणाऱ्या उमेदवारालाच मतदान झाले पाहिजे !

Advertisement

बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड.कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे प्रतिपादन 

सोलापूर : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ही निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांनी एवढी प्रतिष्ठेची केली आहे की यामध्ये सर्वसामान्य जनता कुठेच दिसत नाही. ज्याला-त्याला फक्त सत्तेची खुर्ची पाहिजे. परंतु जो उमेदवार कायम आपल्या सोबत राहील, मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देईल, अशाच उमेदवाराला मतदान करणे, हे सुजाण मतदार म्हणून आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
हैद्रा (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर)  येथे बहुजन रयत परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, खरंतर स्नेहभोजन हे एक निमित्त असतं एकत्र येण्याचे. या एकत्र येण्यातून विविध विषयांवर चर्चा होते. विचारांची देवाणघेवाण होते. आपापसात एकोपा वाढतो आणि हीच एकीची ताकद परिवर्तनाला विधायक दिशा देते.
सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरु झाहे. प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतांची गोळाबेरीज करत आहे. उमेदवारांकडून विविध समाजाला, संस्था, संघटनांना, तरुण मंडळांना आमिषे दाखवली जाताहेत. अशा वेळी आपल्या संघटनेची नेमकी काय भूमिका असावी, याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, बहुजन रयत परिषद या आपल्या लढवय्या संघटनेचे आपण सगळे लढवय्ये शिलेदार आहात. गेली 40 वर्षे ही संघटना बहुजनांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रातील गावागावात, खेडोपाड्यात संघटनेच्या शाखा स्थापन होत आहेत. संघटनेची ताकद पहिल्यापेक्षा आता दुपटी-तिपटीने वाढली आहे. प्रशासन देखील आपल्या आंदोलनाची दखल घेत आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्न सुटू लागलेत. सांगायचा उद्देश हाच की आता सगळीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावागावात पोहोचलेल्या संघटनेची ताकद आपल्या पाठीशी असावी, असं आता प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला वाटू लागले आहे. आपल्या संघटनेची ताकद एवढी मोठी आहे की कोणत्या उमेदवाराला निवडायचं आणि कोणत्या उमेदवाराला पाडायचं, हे आपण सहज करु शकतो. म्हणूनच या निवडणुकीत बहुजन रयत परिषद कुणाची ताकद वाढविणार, कुणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आपली एखादी छोटीशी कृतीदेखील फार मोठा परिणाम साधू शकते, याचा ट्रेलर आपण थोड्या दिवसांपूर्वी पाहिलाच असेल. मी जेव्हा पवार साहेबांचा डीपी ठेवला तेव्हा सगळ्याच न्यूज channel च्या पत्रकारांनी वेगवेगळे अर्थ लावून बातम्या प्रसिध्द केल्या. या एवढ्याशा कृतीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक मला भेटायला आले. अनेकांनी मला त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर पण दिली. ही आहे आपल्या संघटनेची ताकद.
त्या पुढे म्हणाल्या की, खरतर बहुजन रयत परिषद ही एक सामाजिक संघटना आहे. बहुजन म्हणजे कोण? तर सामाजिकदृष्ट्या मागास असलेला समाज. मग तो कोणत्या का जातीचा असेना. शासकीय सोयीसुविधांपासून, विकासाच्या संधीपासून दूर असलेल्या अशा बहुजन समाजाच्या हितासाठी झटणारी, प्रसंगी रस्त्यावर उतरुन प्रशासनाविरुध्द लढणारी आपली ही संघटना आहे. आपल्या संघटनेत विविध जातीधर्माचे लोक निष्ठेने काम करतायेत. संघटना त्यांच्या कामाला ताकद देतेय. गेल्या 40 वर्षात या संघटनेने अनेक नेते घडविले. संघटनेचे अनेक पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आमदार, मंत्री झालेत. पण संघटना आजही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. विविध क्षेत्रातील अनुभवी पदाधिकारी संघटनेत आहेत. ही संघटना म्हणजे एक अनुभवी वटवृक्ष आहे. एका सामान्य माणसाला कार्यकर्ता ते एक उत्कृष्ट नेतृत्व बनविण्याची ताकद आपल्या संघटनेत आहे. आणि म्हणूनच संघटनेचा राजकारणाशी थेट संबंध नसला तरी पण आपली ही संघटना राजकारणात काय बदल घडवू शकते, याचा अंदाज आता सगळ्यांनाच आला आहे. अशा या संघटनेचे नेतृत्व करत असताना कोणतीही राजकीय भूमिका घेताना ती सर्वांशी सल्लामसलत करुन अत्यंत विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे, असं मला वाटतं.
मी आपल्याला याठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगेन की भविष्यात जर मी एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करणार असेन तर तो प्रवेश माझ्या एकटीचा असेल, संघटनेला घेऊन पक्षप्रवेश होणार नाही. कारण संघटनेचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संघटना कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, याचाही निर्णय सर्वांना विचारात घेऊन घेणे गरजेचे आहे. कारण संघटनेत काम करणारे काही पदाधिकारी हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुध्दा आहेत. त्यामुळे चर्चा होणे गरजेचे आहे. मला एकटीला वाटले म्हणून निर्णय घेतला, असे संघटनेत होत नाही. संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याशी सल्लामसलत करूनच निर्णय घेतला पाहिजे. त्या निर्णयात एकमत आलं पाहिजे.
मी काही दिवसांपूर्वी जो पवार साहेबांसोबतचा व्हाट्‌सअप स्टेटस ठेवलेला तो खूप चर्चेत आलेला. खरंतर तो कुठल्या राजकीय हेतूने ठेवला नव्हता. पण आताची सगळी राजकीय परिस्थिती आणि आपल्या संघटनेच्या संस्थापकांच्या कामाचा आलेख बघितल्यावर मला एक गोष्ट प्रकषनि जाणवली, ती म्हणजे सत्तासंघर्षांचा टोकाचा टप्पा. तो फोटो अनेक गुपितं सांगून गेला. 15 वर्षांपूर्वीची राजकीय परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यावेळी नेतृत्वाचे काम तिकीट मिळवून द्यायचं आणि आज नेत्याची मर्जी आणि हुजरेगिरी तिकीट मिळवून देतं. त्यावेळी कष्टाने आणि मतदाराच्या मतानेच उमेदवार निवडून यायचा. लोकमताला तेव्हा किंमत होती. आज लोकमताची किंमत पैशात मोजली जातेय. तिकीट कसे आणि कोणाला मिळते, याची उदाहरणे आपण सगळ्यांनीच जवळून बघितली आहेत. मात्र साहेब 2014 नंतर भारतीय जनता पार्टी सोबत काम करत आहेत. 2019 साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 2019 च्या निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडली. त्यांच्या या निष्ठेसाठी आणि त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी साहेबांना पक्षाने तिकीट द्यायला पाहिजे होते, परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी साहेबांचे नाव चर्चेत असताना आणि लोकमत त्यांच्या बाजूने असतानाही पक्षाने उमेदवारी डावलली. बहुजन समाजासाठी लढणारा, त्यांच्या प्रश्नांविरुद्ध आवाज उठविणारा नेता मोठा झाला नाही पाहिजे, हे असलं घाणेरड राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. ही निवडणूक फक्त सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी आहे. जनतेशी कोणालाही काहीही देणेघेणे नाही. हेच यावरुन सिद्ध होते.
निवडणुकांचा हंगाम सुरु झाला आहे. आता आपली वेळ आहे. लोकसभा झाली की लगेच विधानसभा निवडणूक जाहीर होईल. त्यानंतर महापालिका, नगरपालिका, झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका लागतील. निवडणूक कोणतीही असो विजयाचा गुलाल कोण उधळणार, हे आता आपण ठरवायचं. यासाठी आपण कुण्या एका पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही किंवा कोणत्या पक्षात प्रवेश करायचा नाही. परंतु जनतेच्या मनातल्या उमेदवारालाच मतदान करायचे, मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना. जनतेशी बांधिलकी जपणारा, जनतेसाठी लढणारा, जनतेचे प्रश्न सोडविणारा, ज्याने मतदार संघात मतदारांसोबत न्याय केला आहे आणि पुढेही करेल, अशा विश्वासू उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही सगळे आपली सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवून मतदानाचा हक्क बजवाल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.