Advertisement
सोलापूर : सोलापुरात भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ सरळ लढत झाली, सुरुवातीला वैयक्तिक विषयावर नंतर विकासाचा विषय पुढे आला, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मात्र भाजपने हिंदुत्ववादाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली माघार, एमआयएम पक्षाने उमेदवार न देण्याचा घेतलेला निर्णय तसेच काँग्रेस पक्षाच्या अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीत काही नेत्यांकडून फडकले. काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यांसोबतच संविधान बचाव, हा विषय पुढे आणला. संविधानासाठी एमआयएम ने माघार घेतली. मुस्लिम समाजातून मतदान व्हावे म्हणून मशीदीतून मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
मात्र, त्याच वेळी मशीदितून फतवे काढले जात असल्याचा मुद्दा भाजपने गाजवला. हिंदुत्ववाद पुढे आणला,भडक भाषणे सुरु झाली. या निवडणुकीत मुस्लिम समाजाला मतदानाला बाहेर काढण्याचे कारण ठरले. मुस्लिम समाज 40 ते 50 टक्केच्या वर मतदान करत नव्हता. तो यंदा 65 ते 70 टक्के पर्यंत मतदान केंद्रावर गेला. तीच मते या निवडणुकीत निर्णायक ठरतील. त्यातच मराठा आरक्षणावरून समाजामध्ये सत्ताधारी पक्षा बाबत नाराजीचा सूर दिसून आला. बरीच मराठा नेते मंडळी महायुती सोबत होती. अचानक सोलापुरातून मनोज जरांगे पाटील यांचा दौरा झाला परंतु त्यांनी मतदानाबाबत कोणतेही भाष्य केले नाही त्यामुळे उघडपणे एका पक्षाला मराठा समाज मतदान करताना दिसला नाही त्यामुळे त्यांचे मते यंदा निर्णय ठरणारी आहेत.
भारतीय जनता पार्टीचा एक गठ्ठा म्हणून मतदान करणारा समाज म्हणजे पद्मशाली अर्थात साळी. त्या समाजाने मोठ्या उत्साहाने मतदान केले, जय श्रीरामचा नारा त्या भागात जोरात होता. तसेच भाजपचा दुसरा मोठा गठ्ठा मतदार म्हणजे लिंगायत समाज. परंतु सिध्देश्वरची चिमणी पाडल्यानंतर ही मत ही फिरल्याची चर्चा आहे. लिंगायत समाज यंदा काहीसा काँग्रेसकडे वळला. या समाजाची किती मते भाजपपासून काँग्रेसकडे जाणार यावरही भाजपचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला मोची समाज तसेच भटका विमुक्त जाती जमाती समाज. त्या समाजात भाजपने अनेक नेत्यांना फोडल्याचे पाहायला मिळाले. एकूणच या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार यामध्ये मुस्लिम आणि मराठा यांची मत निर्णायक ठरणार आहेत.
