Advertisement
ऍड. कोमलताई यांनी व्यक्त केलेल्या भावना
माझ्या आईची आठवण येते असे म्हणण्यापेक्षा मी तीला विसरूच शकत नाही, असे सांगावे वाटते. तीचा एक अंश म्हणजेच मी आहे. आईचे गोडवे किती गावे.आई बद्दल किती लिहावं. कितीही लिहीलं तर ते पुरं पडेल का. आज, आईची जयंती असल्याने आईच्या आठवणीत थोडे काही शब्द कागदी आपोआप उमटले आहेत. आई हयात नसल्याची जाणीव झाली की मन करपून जाते. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. बोलावू तुज आता, मी कोणत्या उपायी.., आई! असे म्हणताना कंठ अगदी दाटून येतो. आई तुझी, आ..ठ..व..ण येते.
आई आणि माझा ‘बाप’माणूस हेच आम्हा भावंडांचे दैवत. मंगळवेढ्याच्या विठ्ठलाची रखुमाई म्हणून भांड्याकुंड्यांचा संसार ओढताना रखुमाई अनुराधानाने अनेकांचे संसार उभे करण्यातही या विठ्ठलाला साथ दिली. शाहू शिक्षण संस्था, सावली फाउंडेशन, बहुजन रयत परिषद, सूत गिरणी....किती किती केलं. पण, ही रखुमाई विठ्ठलाला सोडून वैकुठा विसावली. देवापाशी गेली.
देव आहे हे आम्ही आईकडून शिकलो. मला आठवतं माझी आई सांगायची की, देव खूप सुंदर दिसतो. खरं तर कुणी पाहिले आहे हो त्याला? पण, आई सांगते ना म्हणून देव सुंदर. पण जेंव्हा तो देवच आपल्यापासून तीला दूर घेऊन जातो तेंव्हा त्या देवाच देवपण कमी होऊन जातं. आई हाच आपला देव असल्याची जाणीव होते.
आई या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ सांगावेत. तिच माऊली, तिच माँ, तिच माय अन् माय-माझी, नुसता आई हा शब्द्च पहा ना... पहिलं अक्षर, ‘आ’ म्हणजे आकाशा एवढी प्रचंड मन असलेली. दुसरं अक्षर ‘ई’ म्हणजेच जिचं ईश्वरा एवढं देवतुल्य. म्हणूनच ती आई. माझी आई... अनुराधा...
आईच्या सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी आज माझं काळिज जळते. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, कुबेरानं आपलं सर्व धन देऊ केलं तरी आईचे उपकार फिटतील का? किती सांगू किती बोलू...
माझी आई माझा पहिला गुरू आणि वडील विद्यापीठ. ढोबळे साहेबांनी समाजाचं ओझं खांद्यावर घेतल्याने हा बापमाणूस कायमच पोराबाळांपेक्षा जनतेत असायचा, आजही असतो. बालवाडी, शाळा शिक्षणचा श्री गणेशाचा आईने गिरवायला शिकवलं. आईने भरपूर पुस्तकं आणून द्यायची. ती स्वत: मला पुस्तकं गोष्टी वाचून दाखवायची आणि म्हणायची, तुला साहेबांबरोबर सारखी बाहेर फिरते गं. पण, ही पुस्तकही जवळ ठेवत जा, वाचत जा, ते तुला आयुष्यभर पुरतील आज आईचे हे बोल आठवतात. पण, आई शब्द वाचताना मन रडू लागतं.
मोठी ताई आणि छोटा दादू रूपवान दिसायचा. मी कशी दिसते गं, अस नुसतं विचारल तर तुझ्याकडे जे नाही याचा विचार करू नको, तुझ्याकडे काय आहे याचा विचार कर, सुखी होशील असा कान मंत्र दिला. पण, आज माझ्याकडे माझीच आईच नाही. तीची आठवण आली की मी साहेबांना पाहते, ताईला पाहते, दादाला पाहते.
साहेबांबरोबर जनमाणसांत सारखी मिसळायचे तेंव्हा लोकांची उमेद वाढवणारं काम कर, लोकांचा आधार बन, कर्तव्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो आणि कर्तृत्वापाशी थबकतो, हे कायम लक्षात ठेव. आईचे हे शब्द मनावर कायम कोरले गेले आहेत.
साहेबांबरोबर असताना आईने पाठबळ दिलं. साहेबांकडून समाज सेवेचा वसा घेताना मी आईला नमस्कार करायचे, तेव्हा ती म्हणायची, जसं आपल्या मुलांवर प्रेम करशील तसं समाजातील लोकांवर कर. राजकारण करणारी नुसती बाई होऊ नको तर त्यांची आई हो. तिचं बोलणं लक्षात ठेवून साहेबांचे बोट धरून आज काम करीत आहे. सोबत साहेबांची असली तरी मार्ग मात्र आईने दाखवला. आई म्हणायची प्रत्येकालाच आपली भूमिका शंभर टक्के पटेल असे नाही, कित्येक लोकांना तुझी क्षमताच माहीत नाही. ते तुझं तुला माहिती आहे. जगापुढे ते अजून सिद्ध करून दाखवं. टीकेकडे सकारात्मक दृष्टीने बघ. झपाटून काम कर. टीकेकडे देखील सकारात्मक दृष्टीने बघता येतं, हे मला माझ्या आई अनुराधा नावाच्या विश्वकोशाने शिकवलं.
सामाजासाठी काम करताना काही वेळा आई आणि साहेब टीकेची धनीही ठरले. पण, आई कुटुंबाबरोबर पहाडासारखी उभी होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेबांची सावली आणि आमची माऊली म्हणून ती कधी कमी पडली नाही. आईला कोणत्याच गोष्टीचा कधी कमीपणा वाटला नाही. कारण, पिढी घडवणारी माणसं कमी प्रतीची नसतात. उलट त्यांचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या बहुजन समाजातील मुला-मुलींना शिक्षण मिळावं म्हणून आई झिजली. आज ज्या काही शिक्षण संस्था आपण बघतो आहोत त्या पै-पै करून उभ्या राहिल्या आहेत, याची जाणीव आई सातत्याने करून देत होती. यातून स्वयंसिद्ध स्त्रीचा घर आणि समाजात किती मान राखला जातो. हे आज येथे जमलेल्या गर्दीतून कळत आहे. आईने आपल्या सर्वांच्या मनात अढळस्थान निर्माण केलं आहे. हो निश्चितच.
आज, शाहू शिक्षण संस्था, सावली फांउडेशन, गिरणी असा आपला मोठा गोतावळा निर्माण झाला आहे. यातील प्रत्येक माणूस आपला आहे, अशी आईची प्राजंळ भावना कायम होती. जी आम्ही जपतो आहोत आणि कायम जपत राहू, अशी ग्वाही आईचे स्मरण करून देते. आई आणि ढोबळे साहेबांसोबत आपण सर्वजण कायम उभे राहिला आहात. आपले एक कुटुंब आहे. आईला शोधताना मी या कुटुंबातील प्रत्येक माय माऊली मला माझी आई वाटते. कारण, या बायाबापड्यांनी आई बरोबर चांगले-वाईट दिवस घालवले आहेत. त्यांच्याकडेही आईच्या आठवणींचा ठेवा आहे. याच आठवणींच्या शिदोरीतून आपलं प्रेमाच नात घट्ट झालं आहे. शाहू शिक्षण संस्था, सावली फाउंडेशन आणि बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून आपलं हेच कुटुंब समाजाच्या उत्कर्षासाठी कायम एकजुटीने कार्यरत राहयला हवी, अशी अगदी छोटीशी अपेक्षा आहे. आईला शोधताना नजर भिरभिरत असते, माझ्या आईला मी आपल्या सगळ्यांत शोधते. आम्हा भावंडांसोबत आमचा ‘बाप‘माणूस कणखरपणे उभा आहे. पण, मायमाऊलींनो त्यांच्यामागेही आपणी मायबाप म्हणून उभे राहवे, हिच माझ्या आईला खरी श्रद्धांजली, आई वंदन करते, नमन करते आणि थांबते.
