#

Advertisement

Saturday, May 4, 2024, May 04, 2024 WIB
Last Updated 2024-05-04T10:30:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आई-वडिलांच्या कष्टाची जाण असली पाहिजे : वसंत हंकारे

Advertisement

स्व. सौ. अनुराधा ढोबळे पुण्यतिथीनिमित्त ‘आई-वडील समजून घेताना’ व्याख्यान

मंगळवेढा : आई, वडील व शिक्षक ही आपली दैवतं आहेत. शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. परंतु आई-वडील आपल्या मुलांना फक्त लहानाचे मोठे करत नाहीत तर संस्कारांचे शिंपण घालून संस्कारक्षम पिढी घडवितात. म्हणूनच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी राबणाऱ्या आई-वडिलांचा संघर्ष, त्यांनी सोसलेले कष्ट याची जाण आपल्याला असली पाहिजे, असे प्रतिपादन युवा व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.
मंगळवेढा येथे शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्त स्व. सौ. अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांच्या तृतीत पुण्यस्मरण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘आई-वडील समजून घेताना’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी मंत्री तथा भाजपा राज्य प्रवक्ते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, त्यांची कन्या बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे, अजय साळुंखे व संपूर्ण ढोबळे कुटुंबीय उपस्थित होते. 
कार्यक्रमाची सुरुवात सुश्राव्य भजन गायनाने झाली. त्यानंतर प्रा. ढोबळे साहेब यांनी आपल्या पत्नीच्या आठवणींना उजाळा देताना थोडक्यात जीवनप्रवास उलगडून सांगितला. तसेच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संस्कारक्षम पिढी घडविताना मुलांना माणूस म्हणून जगण्याचा मंत्र देखील शिकविणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

कोमलताई साळुंखे आईविषयी भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, आई हे प्रत्येकाच्या आयुष्यातील असं एक पान असतं, जिच्याशिवाय आपलं पानही हलत नाही. आई असते तेव्हा सगळी कामे वेळेत आणि अगदी व्यवस्थित होतात. आपल्याला काहीच करावे लागत नाही. पण ती नसते तेव्हा मात्र आपले आयुष्य लंगडे झाल्यासारखे वाटते. असे असूनही आपण आई-वडिलांना गृहीत धरत असतो. त्यांना कधी समजूनच घेत नाही. रक्ताचे पाणी करून आई-वडील आपल्याला वाढवतात. स्वत:च्या इच्छा-आकांक्षा मारून आपली स्वप्ने पूर्ण करतात. पण त्यांनी केलेला त्याग आपल्याल्या कधी आठवत देखील नाही. आपण स्वत:चे वेगळे विश्व तयार केलेले असते, ज्यात आई-वडिलांना स्थान नसते. कदाचित म्हणूनच आई-वडिलांना समजून घ्यावे, हे सांगायला आज कुणाची तरी गरज लागते, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्यांनी आपलं आख्ख आयुष्य तुम्हाला दिले, त्या आई-वडिलांसाठी मुलांनी वेळ दिला पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. कारण आई-वडिलांना वजा करून कुणाचेही आयुष्य सुखी झालेले नाही. 
‘आई-वडील समजून घेताना’ हे फक्त व्याख्यान नाही तर तो मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई-वडिलांनी उपसलेल्या कष्टाचा हुंकार आहे. युवा व्याख्याते वसंत हंकारे यांच्या वाणीतून हा हुंकार समाजात पोहोचविण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कोमलताई यांनी शेवटी सांगितले. 
कार्यक्रमास शाहू शिक्षण संस्था, बहुजन रयत परिषद, सावली फाउंडेशन या तिन्ही संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, संघटनेचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.