Advertisement
कोर्टाने सरकारी वकिलांची मागणी फेटाळली
पुणे : हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा वडील विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालला याआधी पुणे सत्र न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची आज कोठडी संपणार असल्याने त्याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी विशाल अग्रवालची पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पण कोर्टाने त्यास स्पष्ट नकार दिला. विशाल अग्रवालच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. तसेच कोर्टाने विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विशाल अग्रवालवर आज पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. याप्रकरणी आम्हाला आणखी तपास करायचा आहे. त्यामुळे विशाल अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांची पोलीस कोठडी आम्हाला मिळावी, अशी मागणी पुणे पोलिसांनी आज कोर्टात युक्तिवाद करताना केली. पण कोर्टाने या प्रकरणी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असं स्पष्ट केलं.
