Advertisement
आमदार रोहित पवार यांची टीका
मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या अँब्युलन्स घोटाळ्यात ज्या कंपनीला टेंडर मिळाले, त्या कंपनीची स्थापनाच मुळी चक्क टेंडर मिळाल्यानंतर झालीय. म्हणजे आधी पेपर पास झाले आणि नंतर परीक्षेचा फॉर्म भरला असा हा सगळा सावळा गोंधळ आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
मर्जीतल्या लोकांना काम मिळावं म्हणून सर्व कायदे आणि नियम हवे तसे मोडणे हे सोपं नाही! तरीही पोखरलेल्या व्यवस्थेने ते करून दाखवलं. पण न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतल्याने आज नाही तरी उद्या मात्र या प्रकरणाचा भांडाफोड झाल्याशिवाय राहणार नाही, असं खुलं आव्हान रोहित पवार यांनी दिलं आहे.
काय आहे प्रकरण...
राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने निविदा देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. राज्यातील अत्यावश्यक सेवांसाठी दावोसमध्ये एका स्पॅनिश कंपनीबरोबरचा करार पिंपरी-चिंचवड येथील सुमित या कंपनीने द्वारे करून दिला होता, आता पुन्हा रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे.
