Advertisement
पुणे : कार अपघातामधल्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरेला अटक करण्यात आली आहे. रजेवर असतानाही आपल्या सहकारी डॉक्टरकडून अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलून टाकल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे. ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणार अड्डा? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दारू पिऊन दोन जणांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली, हे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांसह हॉस्पिटलचीही न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
डॉ. तावरेची ससूनच्या अधीक्षक पदी नियुक्ती करावी असं पत्र राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंनी लिहिलं होतं. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झाल आहे. डॉ. अजय तावरे गेली 15 वर्ष ससूनमध्ये काम करतायत. मग त्यांची बदली का होत नाही. तावडेंचा नेमका गॉडफादर कोण, असे सवालही विरोधकांनी केले आहेत. ससूनमधल्या कारनाम्यांची यादीही प्रचंड मोठी आहे.
