Advertisement
शरद पवारांनी अखेर केलं स्पष्ट
मुंबई : शरद पवार यांनी आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलिन होतील असं भाकित वर्तवलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान यानंतर शरद पवार यांनी आपल्या विधानामागील अर्थ समजावून सांगितला आहे. प्रादेशिक पक्ष सरसकट विलीन होतील, असं नसल्याचं त्यानी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस पक्षाच्या विचाराजवळ असणारे काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ राष्ट्वादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून एकत्र काम करत आहेत. अनेक वर्षं एकत्र काम कऱण्याचा अनुभव आहे. आपण अधिक एकत्रित काम करण्याची भावना मांडली असेल तर त्यात आक्षेप घेण्याचं कारण नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. प्रादेशिक पक्ष सरसकट विलीन होणार नाहीत हे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केल आहे.
काही झालं तरी गांधी, नेहरुंचा विचार आणि भाजपाचा विचार याच्यात काही साम्य नाही असं शरद पवारांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करत आहे. आम्ही एकत्रित निवडणुका लढल्या आहेत. अनेक मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार आणि राष्ट्रवादीकडून सहकार्य असं होत होतं. आता अजून एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे असं शरद पवार म्हणाले आहेत.
