Advertisement
पुणे : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. पुण्यातील बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत, धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आधी आंदोलन केलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंचा फोटो असलेल्या एका खोक्यावर 50 खोके, असं लिहिण्यात आलं आणि हातात 500 रुपयांच्या बनावट नोटा घेवून घोषणा दिल्या. हाच पैशांचा खोका घेवून धंगेकर आणि अंधारे, पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागात शिरले आणि उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त चरणसिंग राजपूत यांच्यावर भडकले.
हफ्ते घेवून बेकायदेशीर बार आणि पब सुरु असल्याचा आरोप धंगेकरांनी केला. कोणत्या बार आणि पब कडून किती पैसे घेतले जातात, त्याची यादीच सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली. तर चरणसिंग राजपूत यांनी वसुलीचे आरोप फेटाळले असून, अशी कुठं वसूली होत असेल तर चौकशी करणार असल्याचं म्हटलंय आहे.
धंगेकर आणि अंधारेंनी 48 तासांचा वेळ पुण्यातल्या उत्पादन शुल्क विभागाला दिला आहे.48 तासांत बेकायदेशीर पब आणि बारवर कारवाई न झाल्यास, बुल्डोझर चालवण्याचा इशारा अंधारेंनी दिला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी धंगेकरांचा स्टंट असून, माझ्या फोटोचा वापर करुन 50 खोके असं लिहून बदनामी केल्याचं म्हटल आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आमदार धंगेकरांविरोधात तक्रारीची तयारीही केली आहे.
