Advertisement
पुणे: ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केल्यानंतर वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या अपघात प्रकरणामध्ये डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर या दोघांविरोधात 120 B, 467, 201, 213 आणि 213 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या कटात सहभागी होणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, पुरावा नष्ट करणे या कलमांखाली दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी कथित स्वरुपात मद्यधुंदावस्थेत कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याला तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याच्या रक्ताचे नमुने घेतले खरे. पण तेच नमुने चाचणीसाठी न पाठवता ते कचरा पेटीत टाकले. यानंतर त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला या अल्पवयीन मुलाचे नमुने म्हणून पाठवले.
